पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत झेड ब्रीज जवळ काल रात्री ८ च्या सुमारास २ गटात तुफान राडा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्याचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. या घटनेत एकजण झाला गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये पाच ते सहा जण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यात गुन्हेगारीत वाढ होत असताना या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री- अपरात्री गाड्यांची तोडफोड होऊ लागली आहे. कोयता गँगची दहशतही वाढत आहे. अशातच कालच्या राड्याचा हा सीसीटीव्ही समोर आला आहे. या घटनेत तरुण गाडीवरून येत राडा घालत असल्याचे दिसून येत आहे. एकमेकांना कोयता, दगडाने मारहाण केल्याचे दिसते आहे. रस्त्याच्या मधोमध गाड्यांची ये - जा सुरु असताना हा प्रकार घडला आहे. अचानक सुरू झालेल्या राड्याने लोकांचीही धावपळ होताना दिसून आली आहे. एकाने केलेल्या कोयत्याच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. त्यावेळी टोळक्याकडून हल्ला करत गाड्यांची तोडफोडही करण्यात आली आहे. या प्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये पाच ते सहा जण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.