गुंतवणुकीवर १२०% नफा मिळवून देण्याचा बहाणा; महिलेला तब्बल १ कोटींचा गंडा
By भाग्यश्री गिलडा | Updated: April 11, 2024 17:25 IST2024-04-11T17:24:53+5:302024-04-11T17:25:13+5:30
सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठवत महिलेला गुंतवणुकीसाठी केवायसी अपडेट करण्याची गरज असते असे सांगितले

गुंतवणुकीवर १२०% नफा मिळवून देण्याचा बहाणा; महिलेला तब्बल १ कोटींचा गंडा
पुणे: गुंतवणुकीवर चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेला गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हिना मेहता नावाच्या महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दखल करण्यात आला आहे.
याबाबत राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेने सायबर पोलिसांना फिर्याद दिली आहे. हा प्रकार १३ नोव्हेंबर २०२३ ते १० एप्रिल २०२४ यादरम्यानच्या काळात घडला आहे. फिर्यादी महिला घरी असताना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून त्यांना व्हाट्सअपवर मेसेज आला. हिना मेहता बोलत असल्याचे सांगून ७ दिवस गुंतवणुकीवर १५% नफा, १५ दिवस ४०% नफा आणि ३० दिवस गुंतवणुकीवर तब्बल १२०% नफा देतो असे सांगितले. महिलेने आमिषाला बळी पडून गुंतवणूक करण्यास होकार दिला. सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठवत महिलेला गुंतवणुकीसाठी केवायसी अपडेट करण्याची गरज असते असे सांगितले. त्यानंतर महिलेच्या खात्यावर ४४ हजार रुपये पाठवले. महिलेचा विश्वास बसल्याने अधिक पैसे मिळतील अशा अमिषापोटी तब्बल १ कोटी ३ लाख रुपये सायबर चोरट्यांच्या बँक खात्यावर भरले. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भजनावळे करत आहेत.