नगरसेवकाने "होम क्वारंटाईन" होण्याची नागरिकांची मागणी; लॉकडाऊन काळात गायब असल्याचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 20:01 IST2020-05-12T19:59:45+5:302020-05-12T20:01:29+5:30
नागरिकांचा रोष पाहताच संबंधित नगरसेवकाने करुन घेतली स्वत:ची कोरोनाची चाचणी

नगरसेवकाने "होम क्वारंटाईन" होण्याची नागरिकांची मागणी; लॉकडाऊन काळात गायब असल्याचा आक्षेप
पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केल्यापासून आपल्या प्रभागातून गायब झालेला नगरसेवक थेट 11 मे रोजीच दिसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या नगरसेवकाने तात्काळ कोरोना तपासणी करुन '' होम क्वारंटाईन'' व्हावे अशी मागणी करीत महापौरांनी यामध्ये लक्ष घालण्याची विनंती केली. नागरिकांचा रोष पाहताच संबंधित नगरसेवकाने पालिकेच्या दवाखान्यात जाऊन मंगळवारी स्वत:ची कोरोनाची चाचणी करुन घेतली.
प्रभाग क्रमांक तीन या भागातील सामाजिक कार्यकर्ते विकी औरंगे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी याविषयी आक्षेप घेतला. औरंगे यांनी सांगितले, की या भागातील नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी हे जनता कर्फ्यू लागल्यानंतर परिवारासह बाहेरगावी गेले होते. ते सोमवारी घरी परत आले. ते नेमके कुठे होते, कोणा कोणाच्या संपर्कात आले याची काहीही माहिती लोकांना नाही. पालिका प्रशासनाने याची माहिती घेणे आवश्यक आहे. त्यांनी स्वत:ची तपासणी करुन घेण्याची आवश्यकता आहे. वास्तविक, नागरिकांच्या आणि मतदारांच्या अडचणी समजून घ्यायला आणि याकाळात त्यांना मदत करायला ते महिनाभर उपलब्ध झाले नाहीत. ज्या मतदारांच्या जोरावर ते नगरसेवक झाले त्याच नागरिकांना त्यांनी वा-यावर सोडले असे औरंगे म्हणाले.
यासंदर्भात नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, त्यांची तब्येत फेब्रुवारीपासून बरी नाही. त्यांनी अनेक उपचार घेतले परंतू त्याचा विशेष परिणाम दिसून आला नाही. आयुर्वेदिक उपचार घेण्याकरिता ते हवेली तालुक्यातील एका गावामध्ये गेले होते. या उपचारांकरिता वैद्याकडेच राहणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे एवढे दिवस उपचारांसाठी राहावे लागले. आपले कुटुंब गावी शेतावर राहाते आहे. पालिकेच्या गलांडे रुग्णालयात कोरोनाची तपासणी करुन घेतल्री आहे. मी घरामध्येच राहात असून कुठेही बाहेर जात नसल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या आजारपणाचे केवळ राजकारण केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.