Pune | टेम्पो उलटून भीषण अपघात; एका बालकाचा मृत्यू, १० ऊसतोड कामगार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 13:57 IST2022-12-27T13:53:44+5:302022-12-27T13:57:07+5:30
या अपघातात दहा ऊसतोड कामगार जखमी झाले आहेत...

Pune | टेम्पो उलटून भीषण अपघात; एका बालकाचा मृत्यू, १० ऊसतोड कामगार जखमी
पाटेठाण (पुणे) : राहू (ता.दौंड) येथे ऊसतोड कामगारांना शेतात घेऊन जात असलेले टेम्पो वाहन धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने उलटले. या अपघातात चार वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. दहा ऊसतोड कामगार जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.२६) सकाळी साडेनऊच्या सुमारात बाळोबा मंदिर चौकात घडली.
सद्यस्थितीत राहू बेट परिसरात कारखान्यांचे हंगाम चालू झाले असून याचबरोबर खासगी गुऱ्हाळे देखील जोमाने चालू आहे. अनेक गुऱ्हाळ चालक ऊसतोड वाहतूक करताना ट्रॅक्टरला तीन ते चार ट्रॉली बेकायदेशीरपणे जोडून वाहतूक करताना निदर्शनात येत आहे. ऊसतोड कामगारांची वाहतूक ट्रॅक्टर तसेच टेम्पोच्या माध्यमातून कामगारातीलच एक व्यक्ती चालक म्हणून करतात. विनापरवाना विना प्रशिक्षित वाहतूक होत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. अशा बेकायदेशीर वाहतुकीवर देखील कारवाई करण्याची मागणी या अपघाताच्या निमित्ताने प्रवासी वर्गातून होत आहे.
अपघातातील टेम्पो पिंपळगाव येथील गुऱ्हाळ चालकाचा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात ऊसतोड कामगारांच्या बालकाचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.