यशवंत सहकारी साखर कारखान्यांच्या जमीन विक्रीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 11:58 IST2025-12-13T11:58:24+5:302025-12-13T11:58:42+5:30
- कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती तक्रार

यशवंत सहकारी साखर कारखान्यांच्या जमीन विक्रीला मुख्यमंत्र्यांची स्थगिती
पुणे : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ९९ एकर ९७ गुंठे जमीन हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने २९९ कोटी रुपयांना खरेदीचा व्यवहार झाला होता. यापैकी कारखान्यास काही कोटींची रक्कम यापूर्वी देण्यात आलेली आहे. कारखान्याच्या मालकीची जमीन विक्री करण्यास शासनाने यापूर्वी मान्यता दिली होती. मात्र, या जमीन खरेदी-विक्रीसंदर्भात अनेक त्रुटी असल्याचे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सांगितले होते.
या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त मुख्य सचिव (महसूल) यांना तत्काळ या व्यवहाराची तपासणी करण्याचे आदेश दिले असून तोपर्यंत या व्यवहाराला स्थगिती द्यावी, असे निर्देश दिले आहेत. या सर्व घडामोडींमुळे यशवंत साखर कारखान्याच्या जमीन व्यवहारावर अनिश्चिततेचे सावट असून पुढील निर्णय महसूल विभागाच्या चौकशी अहवालावर अवलंबून राहणार आहे.
जमीन विक्री करावयाची असल्यास त्याला महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाची परवानगी आवश्यक असते. ही जमीन खरेदी करण्याबाबत अनेक त्रुटी असल्याने अशा जमिनींची विक्री करण्यासाठी महसूल विभागाची विशेष परवानगी अपरिहार्य असते. या जमिनी खरोखर वर्ग तीनमधून खालसा करण्यात आल्या आहेत की नाही, याची चौकशी करणे आवश्यक आहे. अनेक आक्षेप मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केले होते. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी ही स्थगिती दिली आहे.