पुणे : ‘छावा’ या छत्रपती संभाजी महाराजांच्या जिवनावरील चित्रपटाची जगभर चांगलीच हवा आहे. तोच ‘छावा’ चित्रपट बघण्याच्या इच्छेने चित्रपट आलेले दोन सराईत पोलिसांच्या हाती लागले आणि चित्रपट गृहातूनच त्यांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या
पथकाने मोका आणि दरोड्याची तयारी अशा गंभीर गुन्ह्यातील फरार दोन आरोपींना जेरबंद केले. धर्मेनसिंग ऊर्फ भगतसिंग ऊर्फ धरम्या सुरजिसिंग भादा (२२, रा. शिव कॉलनी, आदर्शनगर, दिघी) आणि बादशाहसिंग पोलादसिंग भोंड (२३, रा. शिव कॉलनी, आदर्शनगर, दिघी) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत.
आळंदी ते मोशी रस्त्यावरील पेट्रोल पंपावर दरोडा घालण्यासाठी तयारीत असताना खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकाने ९ नोव्हेंबर २०२४ रोजी सापळा रचून या दोघा तडीपार गुन्हेगारांसह तिघांना पकडले होते. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य आणि वाहन असा १ लाख ८० हजारांचा माल जप्त केला होता. त्यावेळी बादशाहसिंग भोंड हा पळून गेला होता. तेव्हापासून तो फरार होता. दिघी येथील शिव कॉलनीत खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथकातील पोलिसांनी २८ ऑगस्ट २०२४ रोजी रस्त्याच्या कडेला गांजा विक्रीसाठी
थांबलेल्या सुरजितसिंग गजलसिंग भादा (३८, रा. शिव कॉलनी, आदर्शनगर, दिघी) याला पकडून त्याच्याकडून ५२ हजार ८१५ रुपयांचा १०५२ ग्रॅम गांजा जप्त केला होता. हा गांजा कोणाकडून आणला याची चौकशी केल्यावर त्याने त्यांचा मुलगा अर्जुनसिंग भादा व भगतसिंग भादा यांनी मंगलसिंग पोलादसिंग भोंड याच्याकडून आणल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक शनिवारी (दि. २२) कोंम्बिंग ऑपरेशन राबवत असताना पोलिस अंमलदार कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे यांना मोक्का व दरोड्याच्या तयारीतील फरार आरोपी वैभव टॉकीज ‘छावा’ चित्रपट बघण्यासाठी येथे येणार असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धर्मेनसिंग भादा आणि बादशाहसिंग भोंड यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर गुन्ह्यांमध्ये
त्यांचा सहभाग निश्चित झाल्याने पुढील तपासासाठी त्यांना दिघी पोलिसांच्या हवाली केले. ही कामगिरी गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक छगन कापसे, सहायक निरीक्षक मदन कांबळे, अंमलदार नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांनी केली.