शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल
By नितीश गोवंडे | Updated: May 23, 2024 17:02 IST2024-05-23T16:59:01+5:302024-05-23T17:02:17+5:30
मोहोळ खून प्रकरणात मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

शरद मोहोळ खून प्रकरणी आरोपींविरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल
नितीश गोवंडे,लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : गुंड शरद मोहोळच्या खून प्रकरणातील १६ आरोपींविरोधात गुन्हे शाखेने विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले. मोहोळ खून प्रकरणात मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
गुंड शरद मोहोळचा खून ५ जानेवारी रोजी कोथरूड भागातील सुतारदरा परिसरात झाला होता. याप्रकरणात आतापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली. मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार, तसेच साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. सध्या सर्व आरोपी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
मोहोळ खून प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यासाठी गुन्हे शाखेकडून ९० दिवसांची मुदतवाढ मिळावी, असा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला होता.त्यानंतर गुन्हे शाखेने पुन्हा मुदतवाढ घेतली होती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे आणि पथकाने तपास केला. मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह १६ आरोपींविरुद्ध विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात गुरुवारी दोन हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले.