पुण्यात पावसाच्या सरींची शक्यता

By Admin | Updated: June 22, 2016 01:13 IST2016-06-22T01:13:43+5:302016-06-22T01:13:43+5:30

मॉन्सूनचे शहरात आगमन झाले असले, तरी हा पाऊस प्रामुख्याने मॉन्सूनच्या उत्तर शाखेकडून येत असल्याने त्यात अद्याप जोर नाही़ शहरातील अनेक भागात मंगळवारी दिवसभरात

Chances of Rainfall in Pune | पुण्यात पावसाच्या सरींची शक्यता

पुण्यात पावसाच्या सरींची शक्यता

पुणे : मॉन्सूनचे शहरात आगमन झाले असले, तरी हा पाऊस प्रामुख्याने मॉन्सूनच्या उत्तर शाखेकडून येत असल्याने त्यात अद्याप जोर नाही़ शहरातील अनेक भागात मंगळवारी दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरी येत होत्या़ शहराचा मध्य भाग, नगर रोड, हडपसर, पिंपरी-चिंचवड परिसरात पाऊस झाला़ रात्री साडेआठ वाजेपर्यंत पुणे वेधशाळेत २़२ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ पुणे व मुंबई परिसरात पुढील काही दिवसांत अधूनमधून पावसाच्या सरी येण्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे़
मॉॅन्सूनच्या पश्चिम शाखेची वाटचाल झाली नसली, तरी उत्तर शाखेने वेळेआधी जोरदार मुसंडी मारत थेट काश्मीरपर्यंत धडक मारली असून, संपूर्ण महाराष्ट्र, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, पश्चिम मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड व हिमाचल प्रदेश, संपूर्ण जम्मू-काश्मीर व पश्चिम उत्तर प्रदेशचा काही भाग व्यापला आहे़ कोकणात पुढील दोन-तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात मॉन्सूनला पोहोचण्यास १ जुलैपर्यंतचा काळ लागतो़ उत्तर शाखेने जोरदार मुसंडी मारल्याने मॉन्सून वेळेआधी काश्मीरमध्ये पोहोचला आहे़ गुजरात, सौराष्ट्र, पश्चिम राजस्थान या भागात दर वर्षी साधारणपणे १५ जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमन होते; पण मॉन्सूनच्या पश्चिम शाखेची वाटचाल गेल्या दोन दिवसांपासून थांबली असल्याने अजूनही हा सर्व परिसर पावसाची आतुरतेने वाट पाहात आहे़
गेल्या २४ तासांत कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला़ कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला़ मंगळवारी संपलेल्या २४ तासांत राज्यात सर्वाधिक पाऊस डहाणू येथे ११६ मिमी पाऊस झाला़ ठाणे ११३, मुंबई, काणकोण ११० मिमी, भांडुप, मार्मागोवा, मुरगाव येथे प्रत्येकी १०० मिमी पावसाची नोंद झाली़ अलिबाग, पालघर, दाभोलीम, मडगाव, मुरुड, केपे, आष्टी, श्रीरामपूर, केज, शिरूर कासार, शेवगाव येथे चांगला पाऊस झाला़ राज्यात अनेक ठिकाणी हलका पाऊस झाल्याच्या नोंदी ठिकठिकाणच्या पर्जन्यमापन केंद्रात झाल्या आहेत़
कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २३ जूनला दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, २४ व २५ जूनला कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Chances of Rainfall in Pune