मृत्यूची ओव्हरलोड रिक्षा; चाकण-तळेगाव मार्गावर टेम्पोची धडक; दोन कामगारांचा करुण अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 20:39 IST2025-12-18T20:30:24+5:302025-12-18T20:39:07+5:30
चाकणमध्ये टेम्पोची रिक्षा जोरदार धडक बसल्याने दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.

मृत्यूची ओव्हरलोड रिक्षा; चाकण-तळेगाव मार्गावर टेम्पोची धडक; दोन कामगारांचा करुण अंत
Chakan Accident : चाकण - तळेगाव दाभाडे महामार्गावर महाळुंगे गावच्या हद्दीत गुरुवारी सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना घडली. बेकायदा प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसल्याने रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर होऊन दोन प्रवाशी जागीच ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने चाकण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रामसुंदर राम खिलावन साखेद (४७ वर्षे, सध्या रा. महाळुंगे इंगळे) व पिंटू राजन बिहारा (२५ वर्षे, महाळुंगे इंगळे) असे या अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. तर रिक्षा चालक रोहिदास सीताराम आडे (३६ वर्षे, रा. खराबवाडी ) व सागर मोहन मॉन्टी (२६ वर्षे, रा. खराबवाडी ) हे दोघे जखमी झाले आहेत.
महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकणकडून औद्योगिक वसाहतीच्या महाळुंगे गावच्या दिशेने बारा प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला समोरून येणाऱ्या टेम्पोची जोरदार धडक बसली. अपघात इतका भीषण होता की, रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात साखेद व पिंटू हे दोघे जागीच ठार झाले.
चाकण परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक सुरू असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. रिक्षांना केवळ तीन प्रवाशांची परवानगी असताना दहा ते पंधरा प्रवासी दाटीवाटीने कोंबून वाहतूक केली जात असल्याचे चित्र वारंवार दिसून येते. अशा बेजबाबदार वाहतुकीमुळेच अपघातांना आमंत्रण मिळत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.