चाकण : भरधाव ट्रकची पाठीमागून दुचाकीस जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक महिला जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित महिलेने दुचाकीस्वारास लिफ्ट मागितली होती. ही लिफ्ट तिच्या जिवावर बेतली. खेड तालुक्यातील वराळे गावच्या हद्दीतील स्पिनी कंपनीजवळ बुधवारी (दि. ४) सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.कविता कृष्णा देवकर (वय ३०, रा. आंबेठाण, ता. खेड) असे या अपघातात जागीच ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. कविता यांना लिफ्ट देणारा दुचाकीस्वार बालाजी लालसिंग राठोड (वय ४०, रा. आंबेठाण, ता. खेड) यांनी या प्रकरणी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दत्तात्रय मल्लिकार्जुन लोखंडे (वय ४६, रा. विमानतळ, हातोरे वस्ती, सोलापूर, ता. व जि. सोलापूर) याच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, बालाजी राठोड हे बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान आंबेठाण येथून त्यांच्या ताब्यातील मोटारसायकलवरून (क्र. एमएच ४२ - एव्ही ९२३८) पुढे वराळे गावाकडे जात होते.त्यावेळी कविता देवकर यांनी लिफ्ट मागितली. राठोड यांनी कविता यांना दुचाकीवर पाठीमागे बसवून आंबेठाण बाजूकडून वासुली फाट्याकडे जात होते. दरम्यान, त्यांची दुचाकी वराळे गावच्या हद्दीतील स्पिनी कंपनीजवळ आली असता पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकची (क्र. एमएच १३ - सीयू ३५४६) त्यांच्या दुचाकीस जोरात ठोस बसली. यावेळी ट्रकच्या डाव्या बाजूचे पुढील चाक कविता यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालक लोखंडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष गिरणार हे अधिक तपास करीत आहेत.
Accident : लिफ्ट बेतली जिवावर; ट्रकने महिलेस चिरडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:59 IST