पुणे : पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील वाहतूककोंडीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या लक्ष केंद्रित केले आहे. ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी येणाऱ्या अडचणीत पोलिस खात्याच्या वास्तूबद्दल अजित पवार यांनी भाषणातच स्टेजवर उपस्थित असलेल्या गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव इक्बाल चहल यांना सुनावले. पुणे पोलिस दलाच्या वतीने विविध योजनांचे उद्घाटन, भूमिपूजन कार्यक्रमाचे शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयावर आयोजन करण्यात आले होते. तेव्हा ते बोलत होते.
अजित पवार यांनी, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बंडगार्डन पोलिस ठाण्याची इमारत हलवण्याबाबतचा आदेश निघाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी सूचना केल्या आहेत. तरी, ते काम अजून झाले नाही, तेव्हा पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की, माझ्याकडून फाइल वर गेली आहे. वर म्हणजे चहल यांच्याकडे. चहल मला ते परत सांगायला लावू नका. माझी विनंती आहे. हिंजवडी येथील रस्ता रुंदीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. तेव्हा लोक म्हणाले, तुम्ही इतरांची बांधकाम काढता, पण, पुलाच्या पुढे गेल्यावर औंध येथील पोलिसांच्या दोन इमारती अजून तशाच आहेत. कितीतरी दिवस झाले. जरा कामातून वेळ काढा, त्याला मान्यता द्या. त्यामुळे आमच्या पुण्यातील वाहतूककोंडी काहीशी कमी होईल. आम्ही जी कामे सांगतो, ती सार्वजनिक कामे सांगतो वैयक्तिक कामे सांगत नाही, असे वक्तव्य केले.
गुंडांचा बंदोबस्त करा
अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये टोळक्याकडून कोयते उगारून दहशत माजवण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. वाहनांची तोडफोड देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अशी कृत्ये करणाऱ्या गुंडांचा बंदोबस्त करायला हवा. मात्र, अशाप्रकारचे कृत्य करणारे बहुतांश आरोपी अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार त्यांना कठोर शिक्षा करता येत नाही. यात काय बदल करू शकतो? नवीन कायदा करू शकतो का? या विकृतीचा बंदोबस्त करणे आपले कर्तव्य आहे, असे म्हणत अजित पवार यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना काय बदल करू शकतो, याबाबत सूचना मागवल्या आहेत.