केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
By नितीन चौधरी | Updated: September 9, 2025 05:49 IST2025-09-09T05:47:33+5:302025-09-09T05:49:15+5:30
PM Kisan Samman Nidhi Yojana new Update: शेतकरी पतीचे मानधन आता रोखले आहे. राज्यातील अशा ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून, त्यांना २० वा हप्ता देण्यात आलेला नाही.

केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
- नितीन चौधरी, पुणे
पंतप्रधान किसान सन्मान योजनेत देण्यात येणाऱ्या मानधनावरून केंद्र सरकार अधिकच कठोर होत आहे. यापूर्वी शेती नावावर असलेल्या शेतकऱ्याला ६ हजार रुपयांचा हप्ता दिला जात होता. मात्र, आता कुटुंबातील पती व पत्नीच्या नावावर शेती असली तरी केवळ पत्नीलाच मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी पतीचे मानधन आता रोखले आहे. राज्यातील अशा ६० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयाचा फटका बसला असून, त्यांना २० वा हप्ता देण्यात आलेला नाही.
केंद्राने पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी दिला. याचा लाभ राज्यातील ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना मिळाला. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर २०१९ पूर्वी जमीन खरेदी असणे आवश्यक आहे. एकाच कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी लाभ घेत असतील तर आता एकालाच लाभ घेता येईल.
सातवा हप्ता आज खात्यात
‘नमो शेतकरी सन्मान योजने’तील २ हजार रुपयांचा सातवा हप्ता मंगळवारी वितरित केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील ९२ लाख ९१ हजार शेतकऱ्यांना याचे ऑनलाइन वितरण केले जाणार आहे.
राज्यातील ६० हजार शेतकऱ्यांना फटका
कुटुंबाच्या व्याख्येनुसार पती, पत्नी व त्यांच्या १८ वर्षांखालील मुलांसाठी हा हप्ता लागू आहे.
मात्र, काही कुटुंबांत पती-पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्याने, अशा कुटुंबांमध्ये दोघांच्याही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला आहे, मात्र पत्नीचा सुरू ठेवला आहे.
केंद्राच्या या नवीन नियमामुळे राज्यातील ६० हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मात्र, त्यांच्या पत्नीला हप्ता देण्यात आला आहे.