सीसीटीव्ही फुटेज, फूटप्रिंट व केस मिळून आले; पण ३६ तासानंतरही बिबट्या काही सापडेना; वनविभाग अपयशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 14:16 IST2025-11-26T14:15:11+5:302025-11-26T14:16:37+5:30
बिबट्या हा मांजर वर्गातील, अंधारात लपून राहणारा आणि एका रात्रीत ६० ते ८० किमीपर्यंत प्रवास करणारा प्राणी असल्याने त्याचा मागोवा घेणे कठीण ठरते

सीसीटीव्ही फुटेज, फूटप्रिंट व केस मिळून आले; पण ३६ तासानंतरही बिबट्या काही सापडेना; वनविभाग अपयशी
पुणे : औंध येथील ब्रेमन चौक परिसरात रविवारी पहाटे बिबट्या दिसल्याची माहिती मिळताच वनविभाग आणि वन्यजीव बचाव पथकांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. पहाटे चारच्या सुमारास बिबट्या दिसल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. सीसीटीव्ही फुटेज, फूटप्रिंट व बिबट्याचे केस मिळून आले. मात्र, त्यानंतर प्रत्यक्षात कुठेही हालचाल दिसली नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातही सीसीटीव्ही व फूटप्रिंट तपास करून शोध घेण्यात आला; मात्र येथे कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. त्यामुळे पुणे शहरात आलेल्या बिबट्याला शोधण्यात वनविभाग अपयशी ठरले. दरम्यान औंध, पुणे विद्यापीठ, बाणेर, चतुशृंगी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बिबट्या हा मांजर वर्गातील, अंधारात लपून राहणारा आणि एका रात्रीत ६० ते ८० किमीपर्यंत प्रवास करणारा प्राणी असल्याने त्याचा मागोवा घेणे कठीण ठरते. सीसीटीव्हीमध्ये तो गोंधळलेल्या अवस्थेत दिसल्याचे वनविभागाचे निरीक्षण आहे. शिंद कॉलनी आणि आरबीआय कॉलनी परिसरात दिसलेला बिबट्या कदाचित मातोबा टेकडी, वेताळ टेकडी, चांदणी चौक किंवा औंध-पुणे विद्यापीठ-रेंज हिल-दिघी मार्गे स्थलांतर करत असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुण्यातील विस्तीर्ण मिलिटरी क्षेत्रातील दाट झाडीमुळे तो कोणाच्याही नजरेस न पडल्याचीही शक्यता आहे. घटनेला ३६ तास उलटल्यानंतरही बिबट्याचा कोणताही मागमूस लागलेला नाही. रात्रीच्या वेळेस तो लपत-छपत निघून गेला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात असल्याचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर मनोज बारबोले यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नागरिकांनी पाळीव श्वान मोकळ्या जागेत न सोडणे, तसेच पहाटे ये-जा करताना आवश्यक ती काळजी घ्यावी. डॉग स्क्वॉड, थर्मल ड्रोन यांसारख्या साधनांच्या मदतीने शोधमोहीम चालू असून, अद्याप बिबट्या आढळलेला नाही. घटनेनंतर शहरात बिबट्याच्या हालचालींबाबत विविध अफवा पसरत असून, एआयच्या मदतीने बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले जात आहेत. या अफवांमुळे वनविभागाला मोठ्या प्रमाणात नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच फुकट वेळ वाया जात आहे. खोटी माहिती, फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल.- मनोज बारबोले, वनपरिक्षेत्र अधिकारी