पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या 'त्या' ३ मुलींसह ८ जणांवर गुन्हे दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 21:04 IST2025-08-18T21:04:21+5:302025-08-18T21:04:48+5:30

छत्रपती संभाजीनगर येथील मिसिंग प्रकरणातील मुलींना तपासासाठी कोथरूड पोलिसांनी बोलावले होते. मात्र, ठाण्यात नेऊन मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप पीडितांनी केला.

Cases have been registered against 8 people, including the 3 girls who demanded a case be filed against the police | पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या 'त्या' ३ मुलींसह ८ जणांवर गुन्हे दाखल 

पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणाऱ्या 'त्या' ३ मुलींसह ८ जणांवर गुन्हे दाखल 

पुणे -  मिसिंग मुलीच्या शोधप्रकरणातून वादाला तोंड फुटून अखेर आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथून आलेल्या पथकाने आणि कोथरूड पोलिसांनी तीन मुलींना तपासासाठी पोलिस ठाण्यात आणले होते. मात्र, या मुलींवर कोथरूड पोलिसांनी मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ केली असल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेविरोधात मुलींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून आता या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सागर आल्हाट, स्वप्नील वाघमारे, दत्ता शेंडगे, ऍड. परिक्रमा खोत, श्वेता पाटील, नितीन पाटील, ऋषिकेश भोलाने आणि ऍड. रेखा चौरे या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १८९(२), १९०, २२१, २२३, ३२४(३) तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१) आणि ३७(३) अंतर्गत बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील मिसिंग प्रकरणातील मुलींना तपासासाठी कोथरूड पोलिसांनी बोलावले होते. मात्र, ठाण्यात नेऊन मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचा आरोप पीडितांनी केला. त्यानंतर त्या व त्यांच्या सहकाऱ्यांनी ३ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते रात्री ३ वाजेपर्यंत पोलिस आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन छेडले.या आंदोलनात सुमारे ५० ते ६० जण सहभागी होते. श्वेता पाटील आणि परिक्रमा खोत यांच्यासह पीडितांनी कोथरूड पोलिसांविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.

पोलिसांनी या घटनेविषयी आंदोलनकर्त्यांना लेखी प्रतिपत्र दिले. त्यात संपूर्ण घटना इनडोअर घडली असल्याचे नमूद केले गेले असून, ॲट्रॉसिटीचा कोणताही ठोस पुरावा नसल्याचे नमूद होते. मात्र हे पत्र श्वेता पाटील यांनी संतप्त होऊन पोलिसांसमोरच फाडले. यानंतर दोन मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात मारहाणीच्या कोणत्याही ताज्या जखमा किंवा व्रण नसल्याचे स्पष्ट झाले. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे न ऐकता सरकारी कामात अडथळा आणला, भडकावू घोषणा देऊन शांतता भंग केली, तसेच असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण केले, असे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा भंग केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती
या आंदोलनाला आमदार रोहित पवार, तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर आणि सुजात आंबेडकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा दिला. मात्र त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही."

Web Title: Cases have been registered against 8 people, including the 3 girls who demanded a case be filed against the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.