हडपसर : महापालिकेचे जागा भाडेतत्त्वावर मिळवून देण्याच्या नावाखाली एका डॉक्टरची २४ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी माजी नगरसेविका, तिच्या पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या संदर्भात माजी नगरसेविका प्राची आल्हाट यांनी शुक्रवारी (दि.१४) पत्रकार परिषद घेत सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे. खोटे आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राजकीय द्वेषापोटी कोणतीही शहानिशा न करता आरोप करत माझ्यावर आणि माझ्या पतीवर खोटी तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावर आलेल्या विविध बातम्यांमुळे जनसामान्यांमध्ये गैरसमज निर्माण केला असल्याचे आल्हाट म्हणाल्या. या प्रकरणात फिर्याददार हे कसे दिसतात कुठे राहतात ते खरच डॉक्टर आहेत का याची कुठलीही कल्पना मला नाही. आणि त्यांच्यासोबत माझी कुठलीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेट झालेली नाही. पोलिसांनी देखील वस्तुस्थितीची शहानिशा न करता राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करून घेतला असल्याचे आल्हाट यांनी सांगितले. या संदर्भात खरे सूत्रधार कोण याची चौकशी करावी, अशी मागणी देखील आल्हाट यांनी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणामुळे माझी आणि माझ्या कुटुंबीयांची नाहक बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा करणार असल्याचे आल्हाट यांनी सांगितले.