शनिवारवाडयात नमाज पठण करणाऱ्या अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 13:31 IST2025-10-20T13:31:22+5:302025-10-20T13:31:53+5:30
नमाज पठण प्रकारणानंतर हिंदू संघटनांकडून शनिवारवाड्यातील कबर हटवण्यासाठी ८ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.

शनिवारवाडयात नमाज पठण करणाऱ्या अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल
पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा दावा केला जात आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून, विविध हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पतित पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवार वाड्यात आंदोलन केलं. संघटनेने सांगितलं की, त्यांनी त्या जागेवर गोमूत्र शिंपडून ती जागा पवित्र केली तसेच शेणाने सारवून जागा शुद्ध करण्याचा विधीही पार पाडला. यानंतर शनिवारवाड्यात ‘शिववंदना’ सादर करण्यात आली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अशा प्रकारच्या घटना भविष्यात सहन केल्या जाणार नाहीत.
खासदार मेधा कुलकर्णी यांनीसुद्धा तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं की, “यापुढे अशा प्रकारचे प्रकार काहीही झालं तरी आम्ही खपवून घेणार नाही.” त्यांनी प्रशासनाला अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी काल शनिवारवाडा येथे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसह आंदोलन केले. त्यानंतर
शनिवारवाडा नमाज पठण प्रकरणात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारवाडा ही भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची वास्तू आहे. पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याकडून रात्री तक्रार प्राप्त झाली आहे. त्यानंतर विश्रामबाग पोलिस ठाण्यात अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास विश्रामबाग पोलिस करत आहेत.
शनिवार वाड्यावर पोलीस बंदोबस्त वाढवला
पुण्यातील शनिवारवाड्यात असणाऱ्या कबरी बाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. काल हिंदू संघटनांनी आणि भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कबरी विरोधात आंदोलन केलं होत. शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्यानंतर आंदोलन करण्यात आलं होतं. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. हिंदू संघटनांकडून ही कबर हटवण्यासाठी ८ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे.