जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बिल्डरसह चौघांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:46 IST2025-11-01T13:44:46+5:302025-11-01T13:46:18+5:30
- पुण्यातील मुकुंदनगर लगतच्या गुलटेकडी परिसरातील टीएमव्ही कॉलनीत हा प्रकार घडला...

जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बिल्डरसह चौघांवर गुन्हा दाखल
पुणे : गुलटेकडी परिसरातील टीएमव्ही कॉलनीतील एका ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या घराचा जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न शुक्रवारी घडला. पोलिसांच्या उपस्थितीतच हा प्रकार होत असल्याचे समोर आले. तसेच, संबंधित ज्येष्ठ नागरिकाच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात थांबवून ठेवल्याने पोलिसांच्या मदतीने हा ताबा घेण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा सुरू आहे. याप्रकरणी बिल्डर देवेश जैन, कॉन्ट्रॅक्टर संजय केंजले, जयेश फुलपगार आणि जेसीबी चालक यांच्याविरोधात अनधिकृत ताबा घेण्याचा प्रयत्न, संपत्तीची हानी आणि धमकी दिल्याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुकुंदनगर लगतच्या गुलटेकडी परिसरातील टीएमव्ही कॉलनीत हा प्रकार घडला. तक्रारदार ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा दोन मजली बंगला या कॉलनीत आहे. या जागेबाबत बिल्डर देवेश जैन (रा. मार्केट यार्ड) यांच्यासोबत व्यवहार झाला होता. मात्र, तक्रारदारांनी घर खाली करण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली होती. त्यांनी स्वखुशीने जागा रिकामी करण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, बांधकाम व्यावसायिकाकडून सतत घर सोडण्याचा दबाव येत होता.
बिल्डरने न्यायालयाची परवानगी न घेता, कॉन्ट्रॅक्टर संजय लक्ष्मण केंजले (रा. दांडेकर पूल) याला सांगून जेसीबी पाठवली. जेसीबी चालक आणि जयेश फुलपगार यांच्या मदतीने बंगल्याच्या कंपाऊंड पाडण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी तक्रारदार आणि त्यांचे कुटुंबीय पोलिस ठाण्यात जबाबासाठी गेले असताना बिल्डरच्या १५ ते २० जणांनी घरात घुसून पाडकाम सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने पाडलेल्या कंपाऊंडचे बांधकाम पुन्हा करण्याचे काम हाती घेतले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक स्मिता पाटील या करत आहेत.
‘कारवाईस विलंब, हा गुन्हाच’
वाघोली येथील कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर ताबा मारण्याच्या प्रकरणात एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाविरोधात अलीकडेच दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. याच निरीक्षकाने वडगावशेरी येथील सुमनदेवी तालेरा यांच्या ताब्यात जमिनीचा ताबा काढून घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असा आरोप तालेरा यांनी केला होता. तसेच, तालेरा यांनी त्यावेळी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्यासही उशीर केला होता, असा त्यांना आरोप आहे. ‘अशा प्रकारच्या घटनांमध्ये कार्यवाही करण्यास जाणीवपूर्वक उशीर करणे हा देखील एक प्रकारचा गुन्हा आहे,’ अशी भूमिका तालेरा यांनी घेतली होती. कोंढवा येथेही अलीकडेच पोलिसांच्या मदतीने सरकारी जमिनीवर ताबा मारण्याचा प्रकार घडला होता. यात पोलिसांवर निलंबनाची कारवाईदेखील झाली होती. त्यामुळे ताबेमारीत पोलिसांना इंटरेस्ट आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.