Ayush komkar Case: सोनाली आंदेकरला ताब्यात घेताना पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 14:14 IST2025-09-19T14:13:35+5:302025-09-19T14:14:47+5:30
सोनाली आणि प्रियंका यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांना रोखले, दोघींना ताब्यात न घेण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातली

Ayush komkar Case: सोनाली आंदेकरला ताब्यात घेताना पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या १३ जणांविरोधात गुन्हा दाखल
पुणे : आयुष कोमकर खून प्रकरणात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची पत्नी सोनाली हिला चौकशीसाठी ताब्यात घेणाऱ्या पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी १३ जणांविरोधात समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कोमकर खून प्रकरणात आंदेकरला पोलिसांनी अटक केली असून, तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या प्रकरणी सोनाली वनराज आंदेकर (३६, रा. डोके तालमीजवळ, नाना पेठ) हिच्यासह प्रियंका कृष्णराज आंदेकर, माया देवळे, येल्लबाबाई कित्तुरकर, लक्ष्मीबाई बेडगिरी, संगीता शिंदे, शारदा साळुंखे, बेबी दोडके, सरूबाई निसारे, कल्पना शिंदे, पूजा शिंदे, स्वाती दोडके, माेहन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलिस कर्मचारी प्रियंका गोरे यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आयुष कोमकर याची सोनाली आणि प्रियंका आंदेकर मामी आहे. कोमकर याचा विसर्जन मिरवणूकीच्या पूर्वसंध्येला नाना पेठेत गोळ्या झाडून कौटुंबिक वाद, तसेच टोळीयुद्धातून खून करण्यात आला आहे. या प्रकरणात आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह १५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगार नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. कोमकर याच्या खुनापूर्वी आरोपींची वानवडी परिसरात एकत्रित बैठक झाली. आरोपी एकमेकांना मोबाइल घरी ठेवून भेटत होते. या प्रकरणात सोनाली आणि प्रियंका यांची चौकशी करण्यात आली होती. तपासात सोनाली खून प्रकरणाचा कट रचण्यात सामील असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तिला चौकशीसाठी गुरुवारी (दि. १८) दुपारी बाराच्या सुमारास ताब्यात घेतले. सोनाली आणि प्रियंका यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यापूर्वी पोलिसांना रोखले. दोघींना ताब्यात न घेण्यासाठी पोलिसांशी हुज्जत घातली. त्यानंतर पोलिसांंनी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सोनाली, प्रियंका आंदेकरसह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक जाधव पुढील तपास करत आहेत.