Pune | पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दोडकेवर गुन्हा दाखल
By विवेक भुसे | Updated: March 23, 2023 17:33 IST2023-03-23T17:32:52+5:302023-03-23T17:33:57+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन दोडके व त्याच्या कार्यकर्त्यांवर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल...

Pune | पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दोडकेवर गुन्हा दाखल
पुणे : आमदार निधीमधून सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन शिवीगाळ करत कामगार व पेंटरांना मारहाण केली. पेंटरचा कलर फेकून दिला. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सचिन दोडके व त्याच्या कार्यकर्त्यांवर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी भाजपचे सरचिटणीस आणि बांधकाम व्यावसायिक वासुदेव शिवाजी भोसले (वय ४५, रा. राजयोग सोसायटी, वारजे) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार वारजे येथील आरएमडी कॉलेज ते साई सयाजीनगरमधील अंडरपासमध्ये मंगळवारी सायंकाळी ७ वाजता घडला.
अधिक माहितीनुसार, फिर्यादी वासुदेव भोसले यांचा बांधकाम व्यवसाय असून, ते भाजपचे सरचिटणीस आहेत. आमदार भीमराव तापकीर यांच्या निधीतून आरएमडी कॉलेज येथील अंडरपास येथे काम सुरू होते. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सचिन दोडके व त्यांचे कार्यकर्ते तेथे जमले. त्यांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून धमकी देण्यास सुरुवात केली. हातात बांबू घेऊन कामगार व पेंटर यांना शिवीगाळ केली. तसेच हाताने मारहाण करून पेंटरचा कलर फेकून देऊन नुकसान केले. याप्रकरणी पोलिसांनी सचिन दोडके, संजय दोडके व त्यांच्या पाच ते सहा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक मुंढे तपास करीत आहेत.