Pune : वारजेत नालेसफाई करताना सापडली काडतुसे, हत्यारे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 15:22 IST2022-11-02T15:15:38+5:302022-11-02T15:22:41+5:30
पुणे-सातारा महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या नाल्यात सफाई करत असताना कर्मचाऱ्यांना एक पिशवी आढळून आली...

Pune : वारजेत नालेसफाई करताना सापडली काडतुसे, हत्यारे
पुणे :पुणे-सातारा महामार्गावरील पॉप्युलर नगर परिसरातील एका नाल्याची साफसफाई करताना महापालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांना शस्त्रसाठा असलेली पिशवी सापडली. त्यात एसएलआर मशीन गनचे ११ जिंवत काडतुसे, चॉपर, गुप्ती, फायटर अशा शस्त्रांचा समावेश आहे.
याबाबत घनकचरा विभागातील अधिकारी शरद पाटोळे (वय ४२, रा. कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. अधिक माहितीनुसार, महापालिकेच्या घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांकडून नालेसफाईचे काम करण्यात येत होते. पुणे-सातारा महामार्गावरील सर्व्हिस रोडच्या बाजूला असलेल्या नाल्यात सफाई करत असताना कर्मचाऱ्यांना एक पिशवी आढळून आली.
त्यामध्ये धारदार शस्त्रे व काडतुसे हाेती. कर्मचाऱ्यांनी तत्काळ ही माहिती वारजे पोलिसांना दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी शस्त्रसाठा ताब्यात घेतला आहे. यातील काडतुसे ही एसएलआर मशीन गनची आहेत.
लोखंडी गुप्ती, सुरे हे गंजलेले असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यावरून शस्त्रसाठा असलेली ही पिशवी अनेक दिवसांपासून नाल्यामध्ये पडली असल्याचा अंदाज आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.