पुण्यात दोन कंटेनरमध्ये कार सापडून आगीचे तांडव, नवले पूल परिसरात अपघात; ३ वर्षांच्या चिमुकलीसह ८ ठार, २२ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 06:56 IST2025-11-14T06:56:30+5:302025-11-14T06:56:44+5:30
Navale Bridge Accident: पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघाताने गुरुवारी शहर हादरले. दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणातच ८ जण जळून खाक झाले, तर २० ते २२ जण जखमी झाले.

पुण्यात दोन कंटेनरमध्ये कार सापडून आगीचे तांडव, नवले पूल परिसरात अपघात; ३ वर्षांच्या चिमुकलीसह ८ ठार, २२ जखमी
पुणे - पुणे-बंगळुरू महामार्गावर नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघाताने गुरुवारी शहर हादरले. दोन कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या जबरदस्त अपघातात काही क्षणातच ८ जण जळून खाक झाले, तर २० ते २२ जण जखमी झाले. मृतांमध्ये ३ वर्षांची चिमुकलीही आहे. मृतांपैकी ६ जणांची ओळख पटली आहे. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कात्रज बोगद्याकडून नवले पुलाकडे येणाऱ्या महामार्गावर हा अपघात झाला.
प्रत्यक्षदर्शींनी ‘लोकमत’ला सांगितले, की एक कंटेनर भरधाव वेगात जात असताना अचानक त्याचे ब्रेक निकामी झाले. यामुळे कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने या कंटेनरने १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली, त्यात ट्रॅव्हलर बस पलटी झाली. त्यामध्ये १८ ते २० प्रवासी होते. धडकेनंतर कंटेनरच्या डिझेल टँकला आग लागली आणि काही क्षणात आगीचे लोट आकाशात झेपावले. यादरम्यान, सेल्फी पॉइंटजवळ एका टुरिस्ट कारला कंटेनरने पाठीमागून धडक दिली. त्यानंतर कार पुढील दुसऱ्या कंटेनरमध्ये अडकली आणि तिनेही पेट घेतला.
सीएनजीचा स्फोट?
प्राथमिक माहितीनुसार, कंटेनरने कारला पाठीमागून धडक दिल्यानंतर कारमधील सीएनजी सिलिंडरचाही स्फोट झाला. त्यामुळे आग भडकली. कारमधील कोणालाही बाहेर पडता आले नाही.
आग लागली अन् काही क्षणांतच झाला कोळसा
आगीमुळे अवघ्या काही क्षणातच कार आणि कंटेनरचा समोरील भाग खाक झाला. कारमधील दोन पुरुष, दोन महिला आणि एका मुलीचा घटनास्थळीच होरपळून मृत्यू झाला. कंटेनरचालक आणि त्याचा क्लीनर यांचादेखील होरपळून मृत्यू झाला. पाच ते सात मिनिटांत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.
वाहतूक पूर्णपणे ठप्प
घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. बचाव पथकांनी जीव धोक्यात घालून मदतकार्य केले. घटनास्थळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.
नवले पुलाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घडली. अपघाताच्या काही मिनिटे आधीच मी तेथून जात होतो. एका कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने तो तीव्र उतारावरून अनेक वाहनांना धडक देत आला. कार व दुसऱ्या ट्रकला जाऊन धडकला. त्या दोन्ही ट्रकच्या मध्ये कार आल्याने त्या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. कार आणि ट्रकमधील प्रवासी पूर्णपणे जळून खाक झाले. अग्निशमन दलाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. पण, ट्रकनेही पेट घेतल्याने त्यातील लोकांना बाहेर काढणे शक्य झालं नाही.
- अक्षय दीक्षित, प्रत्यक्षदर्शी
मृत पुणे परिसरातीलच
अपघातग्रस्त कारमधील मृत पाचजणांची ओळख पटली असून, ते सर्व पुण्यातील धायरी आणि पिंपरी चिंचवडमधील चिखली येथील रहिवासी आहेत. पुण्याजवळील नारायणगाव येथून ते परत येत होते. दत्तात्रय दाभाडे, त्यांची पत्नी शांता दाभाडे, मुलगी स्वाती नवलकर, मोक्षिता रेड्डी, चालक धनंजय कोळी आणि रोहित ज्ञानेश्वर कदम अशी मृतांची नावे आहेत. मोक्षिता ही नवलकर यांच्या शेजाऱ्याची मुलगी होती.