केडगाव : दौंड तालुक्यातील शिरूर चौफुला या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. दौंड तालुक्यातील महत्त्वाचा मानला जाणाऱ्या या महामार्गावरअपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. यातील ८० टक्के अपघात दुभाजकाला गाड्या धडकूनच झाले आहेत. त्यामुळे दुभाजकावर हा महामार्ग फसला आहे असे नागरिकांचे म्हणणे.
टोलनाक्यावरून पारगावकडे जात असलेली ( एम एच १२ इजी १३७३ ) निळ्या रंगाची अल्टो कार शगुन वजन काट्या जवळील दुभाजकाला धडकली. दि. ३ रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महामार्ग प्रशासनाने ही गाडी २४ तास उलटून गेले तरी बाजूला घेतलेली नव्हती. यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. एका महिलेला किरकोळ दुखापत झाली आहे. केडगाव येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनेक नागरिकांनी दुभाजक नको अशी मागणी केली होती. मात्र याकडे महामार्ग प्रशासनाने लक्ष दिले नाही. दुभाजक अनेक ठिकाणी उघडाच दिसून येत आहे. दुभाजकाला ठिकठिकाणी उघडे ठेवल्यामुळे गाडी वळवताना शंभर टक्के अडचण येत आहे. वळणारी गाडी रस्त्यातच उभी राहते किंवा दुभाजकावर आडवी उभी राहते त्यामुळे पुढून किंवा मागच्या बाजूला धडक दिली जात आहे. अनेक गाड्यांना दुभाजक व्यवस्थित न दिसल्यामुळे दुभाजकावर गाडी चालून अपघात होण्याचे अनेक प्रकार या परिसरात घडले आहेत. चौफुल्यापासून पारगाव मोसे या परिसरात दुभाजक टाकला आहे. येथे मोठ्या प्रमाणात अपघातांची मालिकाच सुरू आहे. रस्ता सुरू झाल्या परंतु पासून आतापर्यंत ६० पेक्षा अधिक अपघात झाले आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.