नसरापूर : नसरापूर येथील स्वामी समर्थनगर (ता. भोर) मधील अक्षय देविदास रिंगे (वय २८) या तरुणाचा रविवारी (दि. ४) सुमारे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला असल्याची नोंद राजगड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारा अक्षय नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी नदीच्या बंधाऱ्यावर पोहण्यास गेला होता; परंतु तो नेहमीप्रमाणे आज कमी वेळ पोहून पाण्याच्या बाहेर आला होता. घरी आल्यानंतर थोडासा नाश्ता करून अस्वस्थ वाटल्याने विश्रांती घेतली. त्यावेळी त्यास अचानक त्रास होत असताना त्याच्या आईस त्याने उभा राहत हाक मारली. त्यावेळी तो अचानक चक्कर येऊन खाली जमिनीवर पडला. त्यानंतर त्याच्या शेजाऱ्यांनी व कुटुंबीयांनी त्यास सिद्धिविनायक रुग्णालयात उपचारासाठी नेले त्यावेळी डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अक्षय याच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही.
अक्षयचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. राजगड पोलिस ठाण्यात याबाबत त्याचा भाऊ हर्षल देवीदास रिंगे याने तशी खबर दिली असून, राजगड पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करून मृतदेह शवविच्छेदनासाठी भोर येथे पाठवला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच अक्षयच्या मृत्यूचे कारण समजू शकेल, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या अंत्यविधीप्रसंगी हजारोंच्या संख्येने तरुणवर्ग उपस्थित होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे.