दुसऱ्या जातीची म्हणून टोचून बोलणे, पतीकडून सतत मारहाण, विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 09:54 IST2025-04-19T09:53:57+5:302025-04-19T09:54:28+5:30
पतीने ऑस्ट्रेलिया येथील पर्मनंट रेसिडेन्स व्हिसासाठी तिच्या वडिलांकडून पैसे घेतले, मात्र पर्मनंट व्हिसासाठी अर्जच न करता तिची फसवणूकही केली

दुसऱ्या जातीची म्हणून टोचून बोलणे, पतीकडून सतत मारहाण, विवाहितेचा मानसिक, शारीरिक छळ
पुणे: एका उच्चशिक्षित ३० वर्षीय विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी तिच्या पतीसह सासू, सासरे, दीर आणि जाऊ या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, या पाच जणांनी मिळून तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे म्हटले आहे. विवाहितेचा छळ भारतात आणि ऑस्ट्रेलियात झाल्याबाबत नुकताच सहकारनगरपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार २६ नोव्हेंबर २०२१ ते १७ एप्रिल २०२५ दरम्यान घडला. फिर्यादी महिलेसोबत आरोपी पतीचा विवाह झाला आहे. लग्नाचा सर्व खर्च फिर्यादीच्या घराच्यांनीच केला. पतीने व त्याच्या घरच्यांनी तिला कोणताही मान देता ती दुसऱ्या जातीची असल्याने तिला टोचून बालले जात होते. नोकरी करून घरातील सर्व खर्च करून तिला कोणतीच चांगली वागणूक दिली जात नव्हती. पती तिला सतत हाताने मारहाण करून शिवीगाळ करत होता, असे तिने फिर्यादीत म्हटले आहे. तसेच फिर्यादी ही ऑस्ट्रेलिया येथे पतीसोबत असताना आरोपी तिला सतत भारतात पाठवण्याच्या धमक्या देत होता. तिला घरातील कामे करण्यास लावून तिचे पाहिजे तसे पैसे वापरत होता. त्याने ऑस्ट्रेलिया येथील पर्मनंट रेसिडेन्स व्हिसासाठी तिच्या वडिलांकडून पैसे घेतले. मात्र, पर्मनंट व्हिसासाठी अर्जच न करता तिची फसवणूक केली. तिचा मानसिक व शारीरिक छळ, तसेच आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.