स्वस्तात तांबे विक्रीच्या आमिषाने व्यावसायिकाची ४९ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 14:32 IST2025-06-29T14:30:53+5:302025-06-29T14:32:03+5:30

एप्रिल महिन्यात त्यांनी एका वेबसाइटवर स्वस्तात दक्षिण आफ्रिकेतून तांबे मिळवून देऊ, असा मेसेज पाहिला होता. या मेसेजमध्ये संपर्क क्रमांक देण्यात आला होता.

Businessman cheated of Rs 49 lakhs with the lure of selling copper cheaply | स्वस्तात तांबे विक्रीच्या आमिषाने व्यावसायिकाची ४९ लाखांची फसवणूक

स्वस्तात तांबे विक्रीच्या आमिषाने व्यावसायिकाची ४९ लाखांची फसवणूक

पुणे : स्वस्तात तांबे विक्रीच्या आमिषाने व्यावसायिकाची ४८ लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका व्यावसायिकाने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक तरुण पर्वती भागात राहायला आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी एका वेबसाइटवर स्वस्तात दक्षिण आफ्रिकेतून तांबे मिळवून देऊ, असा मेसेज पाहिला होता. या मेसेजमध्ये संपर्क क्रमांक देण्यात आला होता. त्यानंतर, व्यावसायिकाने संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर, व्यावसायिकाला २५ टन तांबे (काॅपर स्क्रॅप) देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी जाळ्यात ओढले. व्यावसायिकाला एका बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. मे महिन्यापर्यंत व्यावसायिकाने वेळोवेळी चोरट्यांच्या खात्यात ४८ लाख ७२ हजार रुपये जमा केले.

सायबर चोरट्यांनी त्याच्या मोबाइल क्रमांकावर जहाजाने तांबे पाठवत असल्याचे सांगितले होते. प्रवास खर्चाची बनावट बिले सायबर चोरट्यांनी त्याला पाठवली. जहाजाद्वारे पाठविण्यात येणारा माल न पोहोचल्याने व्यावसायिक तरुणाने सायबर चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला, तेव्हा मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड पुढील तपास करत आहेत.

व्यावसायिक महिलेची २५ लाखांची फसवणूक...

स्वस्तात कपडे देण्याच्या आमिषाने एका व्यावसायिक महिलेची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत एका महिलेने बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अर्जुन आणि हर्ष मेहता नावाच्या आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक महिलेची आरोपींची ओळख झाली होती. त्यावेळी आरोपींनी महिलेला महिलांचे कपडे स्वस्तात उपलब्ध करून देतो, असे सांगितले होते. आरोपींना महिलेने रोख स्वरूपात २५ लाख रुपये दिले. पैसे दिल्यानंतर आरोपींनी महिलेला कपडे मिळवून दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक सिसाळ तपास करत आहेत.

Web Title: Businessman cheated of Rs 49 lakhs with the lure of selling copper cheaply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.