हँडब्रेक असूनही बस सरकली: नऱ्हेगावात पीएमपीएमएल बसचा अनियंत्रित अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 23:53 IST2025-11-18T23:53:29+5:302025-11-18T23:53:45+5:30
पुणे: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नऱ्हेगावात घडली. ...

हँडब्रेक असूनही बस सरकली: नऱ्हेगावात पीएमपीएमएल बसचा अनियंत्रित अपघात
पुणे: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नऱ्हेगावात घडली. नऱ्हेगाव-शिवाजीनगर मार्गावरील पुणे महानगर परिवहन महामंडळाची बस क्रमांक MH-12-SF-0720 ही भैरवनाथ मंदिराजवळील शेवटच्या बसस्टॉपवर उभी असताना, चालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि बसच्या संभाव्य तांत्रिक बिघाडामुळे अनियंत्रित होऊन महावितरणच्या डीपीवर धडकली. या घटनेमुळे पीएमपीएमएल प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.
मंगळवारी सकाळी ही बस नेहमीप्रमाणे शेवटच्या थांब्यावर उभी होती. बसचा चालक क्षणभरासाठी खाली उतरला. चालकाने 'हँडब्रेक' लावल्याचा दावा केला असतानाही, बस अचानक पुढे सरकू लागली. हँडब्रेक असूनही बस सरकल्यामुळे बसमध्ये असलेले अंदाजे ६ ते ७ प्रवासी भयभीत झाले आणि एकच घबराट उडाली. बसने रस्त्याच्या कडेला वेग घेतला आणि थेट महावितरणच्या एका मोठ्या ट्रान्सफॉर्मर डीपीवर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, बसची पुढील काच पूर्णपणे फुटली आणि बसचे मोठे नुकसान झाले. तसेच डीपी लगत असणाऱ्या ओम साई ज्वेलर्स तसेच स्वरा लेडीज टेलरच्या डिजिटल बोर्डाचेही नुकसान झाले.
सुदैवाने, ही घटना घडण्याच्या काही सेकंद आधीच एक दुचाकी आणि एक रिक्षा त्या ठिकाणाहून पुढे गेली होती. जर बस त्याच वेळी अनियंत्रित झाली असती, तर मोठा जीवितहानीचा अनर्थ घडला असता. यामुळे प्रवाशांचा आणि परिसरातील नागरिकांचा श्वास रोखला गेला होता.
पीएमपीएल प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट...
नऱ्हेगावात घडलेल्या या घटनेने पीएमपीएमएलच्या कारभारावर आणि बसच्या देखभाल दुरुस्तीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चालकाने हँडब्रेक लावला असतानाही बस पुढे सरकते याचा अर्थ एकतर चालकाचा निष्काळजीपणा खूप मोठा आहे, किंवा बसच्या ब्रेक यंत्रणेत गंभीर तांत्रिक दोष आहे.
नागरिकांनी या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, ही घटना केवळ अपघात नाही, तर पीएमपीएमएल प्रशासनाच्या गलथान कारभाराचा आणि 'तडजोड' केलेल्या सुरक्षेचा परिणाम आहे.
पीएमपीएल प्रवाशांच्या सुरक्षेपेक्षा बसच्या 'रस्त्यावर' असण्याला जास्त महत्त्व देत आहे. जीर्ण झालेल्या आणि तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेल्या गाड्या रस्त्यावर धावून प्रवाशांचा जीव धोक्यात घालत आहेत.
पीएमपीएमएल प्रशासनाने या अपघाताची केवळ 'चालकावर कारवाई' करून बोळवण न करता, तातडीने संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि सर्व बसेसच्या ब्रेक सिस्टीमची तातडीने तपासणी मोहीम हाती घ्यावी, अन्यथा भविष्यात असे जीवघेणे अपघात टाळणे शक्य होणार नाही.