वरवंड/केडगाव : दौंड तालुक्यातील चौफुला येथे पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मौजे बोरीपार्धी गावाच्या हद्दीत, चौफुला जवळ आज (ता. १० ऑक्टोबर २०२५) सकाळी सुमारे १०:२० वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताची घटना घडली. या घटनेत गणेश यादवराव दिवेकर (वय ४५ वर्षे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांचा मित्र प्रताप कांतीलाल साबळे गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की एर्टिगा कारचा चक्काचूर झाला असून वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चिरडला गेला. घटनेनंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , गणेश दिवेकर आणि त्यांचा मित्र प्रताप साबळे हे एर्टिगा गाडीतून पुणे दिशेकडून सोलापूरकडे प्रवास करत होते. दरम्यान, विरुद्ध दिशेने म्हणजे सोलापूरकडून पुणेकडे येणारी अहमद अफसर पटेल (रा. कापलापूर, ता. बालकी, जि. बिदर, कर्नाटक राज्य) यांच्या ताब्यातील बस भरधाव वेगात, निष्काळजीपणे व रस्त्यावरील रहदारी नियमांचे उल्लंघन करून चालवली. बोरमलनाथ फिल्टर प्लॅन्टसमोर आल्यानंतर बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस डिव्हायडर ओलांडून समोरच्या लेनमध्ये येत एर्टिगा कारवर जोरदार आदळली. धडकेचा आवाज एवढा मोठा होता की, आसपासचे नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु गणेश दिवेकर हे गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत झाले. प्रताप साबळे यांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन तो पुढील वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. संबंधित बसचालक अहमद अफसर पटेल याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू घडवल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिकांचा संताप
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कित्येकदा असे प्रकारचे जीव घेणे अपघात होत आहेत. यवत ,वरवंड,पाटस, परिसरातील डीवाईडरची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थ सतत करत आहेत. मात्र या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. परिसरात महामार्गावर डिव्हायडरची उंची अत्यंत कमी असून अनेक वेळा वाहन विरुद्ध दिशेने जात असल्याची समस्या वारंवार घडत आहे. नागरिकांनी अनेक वेळा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला लेखी तक्रारी दिल्या असूनही दुरुस्तीचे काम होत नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे. गणेश दिवेकर यांच्या मृत्यूने वरवंड परिसरात शोककळा पसरली आहे. ते सामाजिकदृष्ट्या कार्यशील व मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनामुळे ग्रामस्थ आणि मित्रपरिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास किशोर वागज पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहे.
Web Summary : A fatal accident near Chawfula in Daund claimed one life and severely injured another. A speeding bus crossed the divider and collided head-on with a car. Local anger rises over divider safety issues.
Web Summary : दौंड के चौफुला के पास एक भीषण दुर्घटना में एक की मौत हो गई, एक गंभीर रूप से घायल। तेज रफ्तार बस डिवाइडर पार कर कार से टकरा गई। डिवाइडर सुरक्षा को लेकर स्थानीय लोगों में गुस्सा।