लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसने घेतला पेट; चालकाच्या सतर्कतेने वाचले प्रवासी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 18:03 IST2021-10-15T18:02:03+5:302021-10-15T18:03:19+5:30
मिनीबसने अचानकपणे पेट घेतल्याने ही बस जळून खाक झालेली आहे. परंतु सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसने घेतला पेट; चालकाच्या सतर्कतेने वाचले प्रवासी
पिरंगुट : मुळशी तालुक्यातील भुगावात लग्नाचे वऱ्हाड घेऊन निघालेल्या सतरा सिटर मिनीबसने अचानकपणे पेट घेतल्याने ही बस जळून खाक झालेली आहे. परंतु सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या बस मध्ये प्रवास करीत असलेले सर्व प्रवासी हे सुखरूपपणे बसच्या बाहेर पडल्याने मोठी हानी टळली आहे.
गाडीचे मालक सागर भाग्यवान कवडे (वय ३३ वर्ष,रा, धायरी फाटा ता. हवेली ) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरंगुट येथून हडपसरला ही बस निघाली होती. तेव्हा या बसमध्ये एकूण बारा प्रवासी होते. ही गाडी भुगाव येथे पोहचल्यावर गाडीच्या रेडिएटर जवळून अचानक धूर यायला सुरुवात झाली. चालकाने हे पाहताच गाडी ताबडतोब रस्त्याच्या बाजूला घेतली. व बस मधील आतील प्रवाशांना खाली उतरविण्यास सांगितले.
बस मधील सर्व प्रवासी तातडीने खाली उतरले. प्रवासी खाली उतरताच काही क्षणातच या गाडीने मोठा पेट घेतला. व या आगीमध्ये ही बस जळून खाक झाली. दरम्यान या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवित झालेली नाही. आग विझवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या दोन आणि परांजपे फॉरेस्ट ट्रेल्स येथील एक अशा एकूण तीन अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी आल्या होत्या. तिन्ही गाड्यांनी मिळून आग आटोक्यात आणली.