काटेवाडीमध्ये घरफोडी, दोन लाखाचा ऐवज लंपास; चोरी सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 19:12 IST2022-08-06T18:54:22+5:302022-08-06T19:12:52+5:30
भर लोकवस्तीत घरफोडीचे प्रकार घडल्याने ग्रामस्थ भयभीत...

काटेवाडीमध्ये घरफोडी, दोन लाखाचा ऐवज लंपास; चोरी सीसीटीव्हीत कैद
काटेवाडी (पुणे): येथे शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्याने एक घर व किराणा दुकानाचे कटावणीने कुलूप तोडून जवळपास दोन लाखांच्या ऐवज लंपास केला. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काटेवाडीतील पालखी ओटा शेजारी असलेल्या संतोष सुभाष काटे यांचे किराणा दुकान व अरुणा भीमराव जाधव यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून साडेतीन तोळ्याचे सोन्याचे दागिनेसह रोख रकम असा दोन लाखांच्या आसपास ऐवज चोरट्याने लंपास केला आहे.
अरुणा जाधव यांच्या घराचा दरवाज्याचे कटावणीने कूलूप तोडून चोरट्याने घरातील पेटीमध्ये असणारी सोन्याची बोरमाळ, तसेच सोन्याचे गंठण, जुबे फूले, आदि सोन्याचा ऐवज व पाच हजार रुपये रोख रक्कम, असे एक लाख सत्यानऊ हजारहून जास्त रक्कमेचा ऐवज लंपास केला आहे.
या घटनेने काटेवाडी परिसरात घबराट निर्माण झाली आहे. सदरची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जवळच्या इमारतीवर सी.सी. टी.व्ही असल्याने ही घरफोडीची घटना यामध्ये दिसून आली. रात्रीच्या साडे बाराच्या दरम्यान हातात कटावणी व डोक्यावर हेल्मेट घातलेली एकच व्यक्ती आढळून आली. मात्र चोरीच्या परिसरात अंधार असल्याने सदरची व्यक्ती स्पष्ट दिसत नाहीये. भर लोकवस्तीत घरफोडीचे प्रकार घडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहे.