दागिन्यांचे ८ लाख न देता सराफ व्यावसायिकाची फसवणूक; पोलीस हवालदारासह त्याच्या मुलीवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 16:39 IST2025-07-18T16:38:43+5:302025-07-18T16:39:40+5:30
सराफा व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर हवालदाराला पोलीस दलातून निलंबीत करण्यात आले होते

दागिन्यांचे ८ लाख न देता सराफ व्यावसायिकाची फसवणूक; पोलीस हवालदारासह त्याच्या मुलीवर गुन्हा दाखल
पुणे : सराफा व्यावसायिकाकडून उधारीवर घेतलेल्या दागिन्यांचे आठ लाख बावीस हजार रुपये न देता फसवणूक केल्याच्या आरोपावरून शहर पोलिस दलातील हवालदारावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार गणेश अशोक जगताप आणि त्याच्या मुलीवर (दोघे रा. कावेरीनगर पोलिस वसाहत, वाकड) हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सराफा व्यावसायिक मनिष सुरेश सोनिग्रा (४२, रा. भवानी पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२४ ते १६ जुलै २०२५ पर्यंतच्या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराफा व्यावसायिक सोनिग्रा यांचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे दुकान आहे. ते भवानी पेठेतील एका सोसायटीत राहायला आहे. जगताप हा पोलिस दलात असल्याने सराफा व्यावसायिकासोबत त्याची ओळख होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात जगताप आणि त्यांच्या मुलीने सराफा पेढीतून आठ लाख 22 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने खरेदी केले होते. दागिन्यांचे पैसे नंतर देतो म्हणत त्याने उधारीवर दागिने खरेदी केल्याचे सराफा व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सराफा व्यावसायिकाने जगताप याच्याकडे उधारीवर खरेदी केलेल्या दागिन्यांचे पैसे परत मागितले. तेव्हा जगतापने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सराफा व्यावसायिकाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. तर यापूर्वी या सराफा व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर जगताप याला पोलिस दलातून निलंबीत करण्यात आले होते. तर एका महिलेचे ७३ तोळे सोने आणि १७ लाख ६४ हजारांची रोकड घेऊन ती देखील परत न करता फसवणूक केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी जगताप याच्याविरोधात कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक करांडे करत आहेत.