Pune Crime | बेदम मारहाण करून सहा लाखांचा ऐवज लुटला; इंदापूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 19:52 IST2023-03-07T19:51:21+5:302023-03-07T19:52:31+5:30
अज्ञात चोरट्यांविरुद्ध वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

Pune Crime | बेदम मारहाण करून सहा लाखांचा ऐवज लुटला; इंदापूर तालुक्यातील घटना
इंदापूर (पुणे) : दरवाजा उचकटून घरात प्रवेश करून पती-पत्नी व नातलग महिलेला चाकूचा धाक दाखवत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून रोख रक्कम व दागिने असा एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना शेळगावनजीक पहाटे घडली. अज्ञात चोरट्यांविरुद्ध वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात मारुती रामचंद्र लकडे (वय ६० वर्षे, रा. घुमटमळा, शेळगाव, ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्यासह त्यांच्या पत्नी सीमा लकडे (वय ५५ वर्षे), बहीण छबूबाई सुभाष नाळे (वय ६५ वर्षे) हे चोरट्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत.
अज्ञात चोरट्यांनी स्वयंपाकघराचा दरवाजा कशाने तरी उचकटून आत प्रवेश केला. चाकूचा धाक दाखवून हातातील लाकडी दांडक्याने आपणास, आपली पत्नी सीमा व बहीण छबूबाई यांना डोके, हातपाय व पाठीवर जबर मारहाण केली. आम्हाला जबर जखमी करून पत्नी व बहिणीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने तोडून घेतले.
जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दीड लाख रुपयांच्या प्रत्येकी अर्धा तोळ्याच्या सहा सोन्याच्या अंगठ्या, ५० हजार रुपयांचे एक तोळा वजनाचे सोन्याचे झुबे फुलांची जोडी, ५० हजार रुपये किमतीचे एक तोळा वजनाचे सोन्याचे कानातले दोन टॉप्स, दीड लाख रुपये किमतीचा तीन तोळ्याचा राणीहार, २० हजार रुपयांचे सोन्याचे ७० मणी, एक लाख रुपयांचे दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, ५० हजार रुपयांचे एक तोळ्याचे सोन्याचे मणी गंठण व ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण ६ लाख १० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लुटला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. जखमींवर बारामती येथील दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. फौजदार विजय टेळकीकर अधिक तपास करत आहेत.