बहिणीवर बलात्कार करणारा सख्खा भाऊ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 02:06 IST2018-12-21T02:05:36+5:302018-12-21T02:06:03+5:30
हडपसरची घटना : कोठडीत रवानगी

बहिणीवर बलात्कार करणारा सख्खा भाऊ अटकेत
पुणे : राहत्या घरात सख्ख्या बहिणीवर बलात्कार करणाऱ्या भावाला हडपसर पोलिसांनी अटक केली. विशेष न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी पोलीस कोठडीचे हक्क राखून ठेवत त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे. याबाबत १७ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. फेब्रवारी २०१७ ते मार्च २०१७ दरम्यान ही घटना घडली.
पीडित मुलीवर तिच्या २० वर्षीय सख्ख्या भावाने जबरदस्तीने दोन महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी बलात्कार केला. यातून ती गरोदर राहिली असून, तिने सप्टेंबर २०१८ मध्ये मुलाला जन्म दिला आहे, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाला न्यायालयात हजर केले असता, आरोपीला मधुमेहाचा त्रास असून इन्सुलिन नियंत्रित ठेवण्यासाठी त्याच्या कंबरेला मशीन बसविण्यात आलेले आहे. त्याच्या किडनीला सूज आहे. तसेच त्याच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासासाठी त्याच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेवत त्याला न्यायालयीन कोठडीत देण्यात यावी, अशी मागणी अतिरिक्त सरकारी वकील अॅड. लीना पाठक यांनी केली.