बहिणीला ‘व्हिडिओ काॅल’ करून भावाने उचलले टोकाचे पाऊल; पत्नीसह दोन मुलींविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 14:42 IST2025-11-02T14:38:22+5:302025-11-02T14:42:18+5:30
- तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तरुणाच्या पत्नीसह दोन मुलींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला...

बहिणीला ‘व्हिडिओ काॅल’ करून भावाने उचलले टोकाचे पाऊल; पत्नीसह दोन मुलींविरोधात गुन्हा दाखल
पुणे : कौटुंबिक वादातून एकाने बहिणीला व्हिडिओ काॅल करून गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पर्वती परिसरात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तरुणाच्या पत्नीसह दोन मुलींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नितीन अशोक साळवे (४२, रा. लक्ष्मीनगर, पर्वती) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
याबाबत त्यांची बहीण पूनम उमेश कांबळे (४०, रा. कोकीळा बिल्डिंग, बालाजीनगर, धनकवडी) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नितीन साळवे यांची पत्नी आरती नितीन साळवे (३८), तसेच त्यांच्या १८ आणि २० वर्षांच्या मुलींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन अशोक साळवे हे मुंबईतील महाराष्ट्र गृहनिर्माण महामंडळाच्या (म्हाडा) कार्यालयात वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत होते. पत्नी आणि दोन मुलींबरोबर ते पर्वती परिसरातील लक्ष्मीनगर येथे राहत होते. कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद व्हायचे. २४ ऑक्टोबर रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास नितीन साळवे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी बहीण पूनम कांबळे यांच्या मोबाईल नंबरवर ‘व्हिडिओ काॅल’ करून संपर्क साधला.
पत्नी आणि मुलींसोबत नेहमी होणाऱ्या वादामुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर त्यांची बहीण पूनम कांबळे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली. कांबळे यांनी पत्नी आणि मुलींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी फिर्यादीत केला. त्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बसवराज माळी करत आहेत.