पुणे: ब्रिटिशांनी देशात बांधलेल्या विविध उड्डाणपुलांची कामे दर्जेदार होती. ते पूल १०० वर्षांपेक्षाही जास्त कालावधी झाल्यामुळे पाडण्यासाठी तेथून आमच्या पीडब्ल्यूडी विभागाला पत्रव्यवहार केला जातो. या प्रकारची कामे सध्या बघायला मिळत नाहीत. आपला देश तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होत असताना पूल, इमारती पडत आहेत. त्याला जबाबदार काेण ? पूर्वीचे लोक आपल्यापेक्षा हुशार होते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
प्रोफेशनल स्ट्रकचरल इंजिनिअरर्स असोसिएशनचे (पीएसईए) उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बाेलत होते. या पीएसईएचे अध्यक्ष शेषराव कदम, अजय कदम, अजय ताम्हाणकर, पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले, शाश्वत विकास, आपत्तीरोधक आणि पर्यावरण सरंक्षक इमारती उभारण्यासाठी स्ट्रकचरल इंजिनिअरर्सने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. ब्रिटिशांनी बांधलेल्या विविध उड्डाणपुलांची कामे दर्जेदार होती. त्या प्रकारची कामे सध्या बघायला मिळत नाही. आपल्याकडील इमारती मजबूत झाल्या पाहिजेत; पण सार्वजनिक बांधकाम विभागाला विचारले एखाद्या इमारतीला किती वर्षे झाले, तर ते सांगतात ४० वर्षे झाली आहेत. ती काढून पुनर्निर्माण केले पाहिजे. असे ते सहज बोलून जातात, असे सांगतात. त्याकाळी मजबूत बांधकाम होऊ शकले. आता का होत नाही. पुणे हे उद्योगाचे केंद्र असल्यामुळे जगातले विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. पीएसईए संघटनेच्या माध्यमातून प्रभावी योगदान देण्यासाठी आणि नवे पर्व ठरण्यासाठी टाकलेले पाऊल आहे. संघटना स्थापना झाल्यावर १२० जणांनी सदस्य झाले आहेत. स्ट्रकचरल इंजिनिअरर्स पुढे अनेक आव्हाने आहेत. ज्ञानाची देवाण-घेवाण करण्याचे काम असोसिएशनच्या माध्यमातून होईल, असे पवार म्हणाले.