२ लाखांची लाच घेताना मिलिटरी इंजिनीअरिंगचे दोन बडे अधिकारी जाळ्यात; पुण्यात सीबीआयची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:32 IST2026-02-07T12:31:57+5:302026-02-07T12:32:28+5:30
पुण्यात मिलिटरी इंजिनीअरिंगमधील लाचखोर अधिकाऱ्यांना सीबीआयने दणका दिला आहे.

२ लाखांची लाच घेताना मिलिटरी इंजिनीअरिंगचे दोन बडे अधिकारी जाळ्यात; पुण्यात सीबीआयची मोठी कारवाई
Pune CBI Raid: पुण्यातील खडकी येथील मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेसमध्ये सीबीआयने सापळा रचून मोठी कारवाई केली आहे. कंत्राटदाराची प्रलंबित बिले मंजूर करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना रंगेहात अटक करण्यात आली. या कारवाईमुळे संरक्षण विभागाच्या बांधकाम विभागात मोठी खळबळ उडाली आहे. सुनील निकम आणि सुरेश म्हस्के अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
तक्रारदार एका खाजगी कंपनीचे पॉवर ऑफ अॅटर्नी असून ते एमईएसची कंत्राटे राबवत आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी सोपवलेली कामे वेळेत पूर्ण केली होती आणि त्याचे कम्प्लिशन सर्टिफिकेट देखील सादर केले होते. मात्र, त्यांचे बिल जाणीवपूर्वक रोखून धरण्यात आली होती. ही देयके मंजूर करण्यासाठी निकम आणि म्हस्के यांनी त्यांच्याकडे ६ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
सीबीआयचा 'सापळा' आणि अटक
तक्रारदाराने या भ्रष्टाचाराबाबत ३ फेब्रुवारी रोजी सीबीआयकडे धाव घेतली. सीबीआयने तक्रारीची शहानिशा केल्यानंतर ६ फेब्रुवारी रोजी खडकी येथे सापळा रचला. वाटाघाटीनंतर लाचेचा पहिला हप्ता म्हणून २ लाख रुपये स्वीकारण्याचे आरोपींनी मान्य केले होते. ज्युनिअर इंजिनीअर सुरेश म्हस्के याला लाचेची रक्कम स्वीकारताना कार्यालयातच पकडण्यात आले, तर या कटात सामील असल्याबद्दल असिस्टंट गॅरिसन इंजिनीअर सुनील निकम यांनाही अटक करण्यात आली.
घरात सापडले रोख लाखो रुपये
अटकेनंतर सीबीआयने दोन्ही आरोपींच्या कार्यालयाची आणि निवासी घरांची झडती घेतली. या झडतीदरम्यान अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह १.८८ लाख रुपयांची संशयास्पद रोख रक्कम सापडली आहे. या रकमेचा कोणताही हिशोब आरोपींना देता आला नाही.
CBI has arrested two military engineering services officers in Pune for taking a bribe. pic.twitter.com/hETitIjHlG
— ANI (@ANI) February 6, 2026
मेरठमधील बँक फसवणूक प्रकरणातील आरोपीला अटक
सीबीआयने याच दरम्यान आणखी एका जुन्या प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. २०१२ मधील ३.६३ कोटी रुपयांच्या पंजाब अँड सिंध बँक फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी रेणू सक्सेना हिला उत्तर प्रदेशातील मेरठ येथून अटक केली आहे. २०१७ मध्ये न्यायालयाने तिला घोषित गुन्हेगार म्हणून जाहीर केले होते. तिने बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या गृहकर्ज मंजूर करून घेतले होते.