लाचप्रकरणी महावितरणच्या सहायक अभियंत्याला अटक;पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भोसरी येथे कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:00 IST2025-06-06T13:59:32+5:302025-06-06T14:00:34+5:30
यातील तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार असून, महावितरणकडील लायझनिंग व कनेक्शनच्या मंजुरीसाठी काम करतात.

लाचप्रकरणी महावितरणच्या सहायक अभियंत्याला अटक;पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची भोसरी येथे कारवाई
पिंपरी : भोसरी येथील महावितरण कार्यालय, स्पाईन सिटी उपविभाग-२ येथे कार्यरत सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे (वय ३४) आणि त्यांच्या ओळखीचा खासगी व्यक्ती श्यामलाल असोकन (वय ३४) यांना २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी रंगेहाथ पकडले.
यातील तक्रारदार हे शासकीय मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदार असून, महावितरणकडील लायझनिंग व कनेक्शनच्या मंजुरीसाठी काम करतात. त्यांनी ४ मार्च २०२५ रोजी एका ग्राहकाच्या घरगुती वीज कनेक्शनसाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे यांच्याकडे कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला होता.
मात्र, काम करून देण्यासाठी नरवडे यांनी सुरुवातीला ३५ हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने २ जून २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. बुधवारी पंचांसमक्ष पडताळणीदरम्यान नरवडे यांनी तडजोड करत २५ हजार रुपयांची लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली. ५ जून रोजी सापळा रचण्यात आला. यामध्ये तक्रारदाराकडून नरवडे यांनी खासगी व्यक्ती श्यामलाल असोकन याला लाचेची रक्कम स्वीकारण्यास सांगितले. श्यामलालने ती रक्कम पंचासमक्ष स्वीकारताच दोघांनाही रंगेहाथ पकडण्यात आले.