Break the PMP bus for the third time in seven days | पीएमपीच्या एकाच बसचे सात दिवसांत तिसऱ्यांदा ब्रेकफेल
पीएमपीच्या एकाच बसचे सात दिवसांत तिसऱ्यांदा ब्रेकफेल

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंंडळाच्या (पीएमपी) बसच्या ब्रेकफेलची मालिका सलग दुसऱ्या आठवड्यातही सुरूच आहे. गुरूवारी (दि. २२) ब्रेकफेल झाल्याने पीएमपीची बस तोफखानाजवळ काम सुरू असलेल्या बीआरटीच्या बॅरिकेट्सला धडकली. सुदैवाने बसमधील प्रवाशांना कसलीही दुखापत झाली नाही. 

मागील आठवड्यात सलग दोन दिवस ब्रेकफेलमुळे पीएमपी बसला अपघात झाला. शुक्रवारी बेंगलुरू महामार्गावर आंबेगाव बु.जवळ ब्रेकफेल झाल्याने कात्रज आगाराची बस एका कारला जाऊन धडकली. दुसऱ्या दिवशीही याच बसचे ब्रेकफेल झाले. ही बस स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गात भारती हॉस्पीपटसमोर बॅरिकेट्सला धडकली. दोन्ही अपघातांमध्ये सुदैवाने प्रवासी जखमी झाले नाहीत. ब्रेकफेलची ही मालिका गुरूवारीही सुरूच राहिली. न.ता.वाडी आगाराची बस (एमएच १२ एफसी ९००५) सकाळी अकरा वाजता मनपा भवन येथून मुंढव्याच्या दिशेने निघाली. अवघ्या काही मिनीटांत बस तोफखाना येथे आल्यानंतर बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. यावेळी बसमध्ये सुमारे २० ते २५ प्रवासी होते. ब्रेक न लागल्याने चालकाने प्रसंगावधान दाखवत मेट्रो कामाच्या सुरक्षा कठड्याला बस धडकावली. सर्व प्रवासी सुखरूपपणे बाहेर पडले. 

दरम्यान, सलग दुसऱ्या आठवड्यात ब्रेक निकामी झाल्याची घटना घडल्याने पीएमपीच्या देखभाल-दुरूस्तीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून मागील आठवड्यात झालेल्या अपघातात चालकाची चुक असल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रत्येक अपघातात चालकाची चुक दाखवून अधिकाऱ्यांच्या चुका व बसच्या योग्यतेवर पडदा टाकला जात असल्याचा आरोप पीएमपीतील कर्मचारी करत आहेत. अपघात झाल्यानंतर चालकांनाच दोषी धरले जाते. पण देखभाल-दुरूस्तीच योग्य होत नसल्याने यात चालकांची काहीच चुक नसते. त्यामुळे अधिकाऱ्यांनाही तितकेच दोषी धरण्यात यावे, अशी मागणीही कर्मचारी करू लागले आहेत. दरम्यान, गुरूवारी झालेल्या अपघाताचा तांत्रिक अहवाल आल्यानंतर अपघाताचे कारण स्पष्ट होईल, असे जनसंपर्क अधिकारी सुभाष गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Break the PMP bus for the third time in seven days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.