Boycott India Pakistan Match: पुण्यात पाकिस्तानी क्रिकेटचा टी शर्ट जाळण्यात आला; सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 19:21 IST2025-09-13T19:20:13+5:302025-09-13T19:21:57+5:30
पहेलगाम हल्ल्यात सहभाग असलेल्या पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे सामने खेळण्याइतकी कोणती अगतिकता भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारला आली आहे

Boycott India Pakistan Match: पुण्यात पाकिस्तानी क्रिकेटचा टी शर्ट जाळण्यात आला; सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन
पुणे : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा सामना रविवारी १४ सप्टेंबरला खेळला जाणार आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ क्रिकेटच्या मैदानावर आमनेसामने येणार आहेत. परंतु या सामन्याला अनेक संघटना, विरोधी पक्षाकडून बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० सैनिकांचे बलिदान आजही प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श करते. अशा वेळी, पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट सामना प्रसारित करणे हे आपल्या शहीदांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष करून त्यांच्या बलिदानाचा अपमान करण्यासारखे असल्याचे काही संघटनांचे म्हणणे आहे. तसेच एप्रिल २०२५ मध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात २६ लोक निर्घृणपणे मारले गेले. या लोकांचे बलिदान दुर्लक्षित करून, भारत-पाक सामना दाखवणे हे केवळ मनोरंजन आणि नफ्यासाठी देशाच्या भावनांकडे दुर्लक्ष केल्यासारखे आहे. त्यामुळे पाकिस्तानसोबत सामना रद्द करावा अशीही मागणी अनेकांकडून होत आहे. पण सामना रद्द न झाल्याने त्यावर बहिष्कार टाकावा हा सामना प्रसारित करू नये असे आवाहन केले जात आहे.
पुण्यात पाकिस्तानी क्रिकेटचा टी शर्ट जाळण्यात आला; सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन#indiaVsPakistan#Boycott#BCCI#PahalgamTerroristAttackpic.twitter.com/vm0WvjiJ8H
— Lokmat (@lokmat) September 13, 2025
पहेलगाम हल्ल्यात सहभाग असलेल्या पाकिस्तान बरोबर क्रिकेटचे सामने खेळण्याइतकी कोणती अगतिकता भारतीय जनता पक्षाच्या मोदी सरकारला आली आहे. असा सवाल करत पाकिस्तान बरोबरच्या सामन्यावर बहिष्कार टाका असे आवाहन पुण्यात आम आदमी पार्टी (आप) ने केले. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय टीमचा सामना रविवारी पाकिस्तानच्या टीमबरोबर होत आहे. त्याविरोधात शिवाजीनगर मेट्रो चौकात आप च्या वतीने निदर्शन करण्यात आली. त्यात पाकिस्तानी क्रिकेटचा टी शर्ट जाळण्यात आला व पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. पक्षाचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील, मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, अभिजीत मोरे, सुरेखा भोसले, अनिकेत शिंदे, सुभाष कारंडे, रवीराज काळे, शितल कांडगावकर, प्रशांत कांबळे, रितेश निकाळजे, सुरेश भिसे, वैभव टेमकर, संग्राम पाटील यांनी आंदोलनात सहभाग घेतला.