दोन्ही गटाला 'कमळा'वर निवडणूक लढवावी लागेल; रोहित पवारांचा निशाणा
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 6, 2024 21:22 IST2024-01-06T21:21:13+5:302024-01-06T21:22:11+5:30
चिंचवड येथील कार्यक्रमात ते पत्रकारांशी बोलत होते.

दोन्ही गटाला 'कमळा'वर निवडणूक लढवावी लागेल; रोहित पवारांचा निशाणा
पिंपरी : भाजपसमोर महाविकास आघाडी टिकू शकणार नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना रोहीत पवार म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्षांनी महाविकास आघाडी बद्दल बोलू नये. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत लोक त्यांची जागा दाखवून देतील. त्यामुळे भाजप नेत्यांना कदाचित अहंकार येवू लागला आहे. त्यांना असं वाटतंय की, आपल्या बरोबर दोन मोठ्या शक्ती असताना त्या गटातील लोकांना भाजपच्याच कमळावर निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे शिंदे गट असू द्या, नाही तर अजितदादा मित्र मंडळ, त्या सर्वांना भाजपच्याच कमळावर निवडणूक लढवावी लागणार आहेत, अशी टिका आमदार रोहीत पवार यांनी केली.
ते चिंचवड येथे कार्यक्रमासाठी आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष तुषार कामठे, रविकांत वर्पे आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, राज्यात दुष्काळ आहे, बेरोजगारी वाढली आहे. तरुणांच्या हाताला काम नाही. शेतक-याचे प्रश्न, दूध, कपासीला भाव नाही. असे प्रश्न असताना देव, धर्म हे व्यक्तीगत विषय असूनही त्यावर चर्चा घडवून आणली जात आहे. यामुळे भाजपने लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी अशा मुद्द्यावर चर्चा घडवून आणली जात आहे. मुळात भाजपमध्ये लोकशाही नाही, तर तिथे एकाधिकारशाही आहे. तिथे लोकांना नव्हे लोकप्रतिनिधींना देखील व्यक्त होता येत नाही. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्याचे काम आपल्या सर्वांना करायचं आहे.
ईडी छापा सत्रावर रोहीत पवार म्हणाले, पवार साहेबांच्या नावाने ईडीची नोटीस निघाली होती. तशी माझ्या नावाने अजून तरी नोटीस निघालेली नाही. मला जर ईडी कार्यालयात बोलवलं तर मी किंवा माझे अधिकारी तिथे जातील. त्यांना हवी ती लेखी उत्तरे, माहिती देतील. मात्र, मी ईडीच्या कारवाईने माझे विचार बदलेन, किंवा त्यांच्या बाजूला जाणार, असं काही होणार नाही. मी माझे विचार सोडून दुसरीकडे कुठेही जाणार नाही.ट्रान्स हर्बल लाईनचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा व्हावा, वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका व्हावी, याकरिता तो मार्ग बनविलेला आहे. त्या मार्गावर ३५० रुपये टोल हा हास्यास्पद आहे.
.. म्हणून महाराष्ट्र दावणीला?
मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते ही पदे संविधानिक आहेत. तर उपमुख्यमंत्री पदे ही संविधानिक आहेत का? हे बघावे लागेल. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याला जर महत्व देत नसतील तर सर्वसामान्य नागरिकांना काय महत्व देणार आहेत. ज्यांनी घोटाळा केलाय, त्यांच्यावर कुठेही कारवाई केलेली नाही. उलट त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जावून सुरक्षित करण्याचे काम केले जात आहे. हे भाजप सरकार सत्तेत आल्यापासून त्यांनी केवळ गुजरातला मोठं करण्यासाठी काम केले आहे. राज्यातील मोठ-मोठे प्रकल्प गुजरातला नेले आहेत. केंद्रातील भाजप नेत्यांना खुश करण्यासाठी महाराष्ट्राला दावणीला बांधले आहे, हे मराठी माणूस कधी खपवून घेणार नाही. असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.