वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्रात मुलींमध्ये भीतीचे वातावरण- चित्रा वाघ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 20:37 IST2022-01-17T20:26:23+5:302022-01-17T20:37:32+5:30
बोरी प्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांचा पुरवणी जबाब घ्यावा, याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी

वाढत्या अत्याचारांच्या घटनांमुळे महाराष्ट्रात मुलींमध्ये भीतीचे वातावरण- चित्रा वाघ
बारामती: राज्यात सुशिक्षित, हुशार मुली छेडछाडीस कंटाळून आत्महत्या करीत आहेत. मुलींवर, महिलांवर अत्याचार होत आहेत. कुठे आहेत पोलीस? कुठे आहेत त्यांचे दामिनी स्कॉड? खंडणी वसुलीमध्ये गुंतलेल्या महाविकासआघाडी सरकारला मुलींच्या, महिलांच्या रक्षणाकडे लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (chitra wagh) यांनी केला.
इंदापूर तालुक्यातील बोरी येथे सोमवारी ( दि.17) भिटे कुटुंबीयांची भेट घेऊन भाजप नेत्या चित्रा वाघ व पुणे जिल्हा परिषदेचे सदस्या अंकीता पाटील ठाकरे यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या कुटुंबातील अल्पवयीन मुलीने छेडछाडीस कंटाळून चार दिवसापूर्वी आत्महत्या केली. सदर घटना एका दिवसांमध्ये घडलेली नाही. पोलिसांनी व समाजाने दखल घेतली असती तर मुलीचा आत्मविश्वास वाढला असता. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने ही घटना शरमेची बाब आहे. गेल्या चार दिवसात महाराष्ट्रात अशा दोन घटना घडल्या आहेत. मालेगाव येथील आशियानेही अशीच जीवनयात्रा संपवली आहे. महाविकास आघाडीचे शासन गांभीर्याने या घटना घेत नाही. महाराष्ट्रात घडलेल्या या घटना अतिशय दुर्दैवी आहे. भविष्यात अशा घटना घडतात कामा नयेत, असे वाघ यांनी सांगितले.
बोरी प्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांचा पुरवणी जबाब घ्यावा, याप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. महिलांचे सशक्तीकरण होत असताना, सर्व क्षेत्रात महिला पुढे येत असताना महिलांचे रक्षण करण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरत असल्याची टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. यावेळी इंदापूर तालुका भाजपा अध्यक्ष अँड. शरद जामदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.