जेजुरी : पुरंदर तालुक्यातील छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग येत असतानाच बोगस खरेदीखतांचे प्रकरण उघडकीस येऊ लागल्याने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विमानतळाच्या जागेसाठी सात गावांतील १२८५ हेक्टर जमीन संपादनाचा निर्णय घेण्यात आला असून, यापैकी ९३ टक्के शेतकऱ्यांनी संमती दिल्याचा प्रशासनाचा दावा आहे. मात्र, बोगस खरेदीखतांमुळे खरे शेतकरी आणि बाहेरगावचे खरेदीदार यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, कुंभारवळण, पारगाव, एखतपूर, उदाचीवाडी, खानवाडी आणि मुंजवडी या सात गावांतील २८३२ हेक्टर जमीन संपादनाचे मूळ नियोजन होते. स्थानिकांचा विरोध लक्षात घेता सरकारने १३८८ हेक्टर क्षेत्र वगळून १२८५ हेक्टर जमीन संपादनाचा निर्णय घेतला. यासाठी रेडी रेकनरच्या चारपट मूल्य आणि १० टक्के जमिनीचा परतावा देण्याचे ठरले आहे. यानंतर भूसंपादनाला वेग आला असून, मुंजवडी, उदाचीवाडी आणि एखतपूर येथील ३२३ हेक्टर जमिनीची मोजणी पोलिस बंदोबस्तात पूर्ण झाली आहे. मात्र, या प्रक्रियेदरम्यान बोगस खरेदीखतांचे प्रकरण समोर येऊ लागले आहे. आतापर्यंत तीन प्रकरणे उघडकीस आली असून, आणखी प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे. स्थानिक दलाल, काही वकील, स्टॅम्प व्हेंडर, साक्षीदार आणि तलाठी यांनी संगनमताने पुणे-मुंबईतील खरेदीदारांना गाठून बोगस व्यवहार केल्याचा आरोप आहे. यात शासकीय अधिकाऱ्यांनीही पडद्यामागून मदत केल्याची चर्चा आहे.
स्थानिक शेतकऱ्यांचा आक्षेप
प्रशासनाचा दावा आहे की, ९३ टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनाला संमती दिली आहे. मात्र, स्थानिकांचे म्हणणे आहे की, यातील बहुतांश जमिनी बाहेरगावच्या खरेदीदारांनी नफ्यासाठी खरेदी केल्या आहेत. यामुळे संमती देणाऱ्यांची टक्केवारी जास्त दिसत असल्याचा आरोप होत आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, १० टक्के जमिनीचा परतावा फक्त खऱ्या शेतकऱ्यांना मिळावा, बाहेरगावच्या खरेदीदारांना नव्हे.
पुरावे असल्यास तक्रार द्या
पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याप्रकरणी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. बोगस खरेदीखतांचे पुरावे असल्यास तक्रार द्यावी, त्यावर योग्य कारवाई केली जाईल. फसवणूक झाल्यास फौजदारी कारवाईही होईल, असे डुडी यांनी सांगितले. याशिवाय, स्थानिक प्रशासनाने बोगस खरेदीखते शोधण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
विमानतळ विरोधी समितीचे आवाहन
विमानतळ विरोधी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष दत्ताशेठ झुरंगे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, फसवणूक झाल्यास तातडीने जिल्हाधिकारी किंवा सासवड पोलिस ठाण्याकडे तक्रार करावी. खऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.