महापालिकेतून मिळतात बोगस जन्म-मृत्यू दाखले; धक्कादायक प्रकार उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 09:56 IST2025-02-15T09:55:29+5:302025-02-15T09:56:31+5:30

डेटा इंट्री करणाऱ्या दोघांना अटक

Bogus birth and death certificates are being received from the Municipal Corporation; Shocking details revealed | महापालिकेतून मिळतात बोगस जन्म-मृत्यू दाखले; धक्कादायक प्रकार उघड

महापालिकेतून मिळतात बोगस जन्म-मृत्यू दाखले; धक्कादायक प्रकार उघड

पुणे : महापालिकेच्या जन्म-मृत्यू विभागात बनावट मृत्यू दाखला तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिघी सागरी पोलीसांनी महापालिकेच्या कोंढवा क्षेत्रीय कार्यालयातील डेटा इंट्री ऑपरेटर स्वप्निल रमेश निगडे व शुभम संजय पासलकर यांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी मृत्यूच्या खोट्या नोंदणी केल्याने महापालिकेचे संबंधित कर्मचारी व अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात यावे, असे पत्र महापालिकेस पाठविले आहे.

कॅम्प भागात राहणाऱ्या एका व्यक्तीची कोकणातील श्रीवर्धन येथे एक एकर जमीन होती. त्यांच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून २०१९-२०२१ दरम्यान ही जमीन विकण्यात आली. ही बाब समोर आल्यावर मूळ मालकाने पोलिसांत तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी हा प्रकार गंभीर असल्याने त्याची तपासणी सुरू केली. त्यावेळी बनावट नावाने विक्री केलेल्या आरोपीचा पत्ता हा कात्रज येथील होता. त्यामुळे पोलिसांनी त्या भागात चौकशी केली असता, संबधित व्यक्ती २०२१ मध्येच मृत्यू पावल्याचे समोर आले.

यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र मागविले. त्यावेळी पालिकेकडून २०२१ मध्येच संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे कळविण्यात आले. पण, प्रत्यक्षात मृत्यूची नोंद झाल्याची तारीख एप्रिल २०२४ दाखविण्यात आली. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी पुन्हा महापालिकेस पत्र पाठवत मृत्यूची नोंद कोणी केली, त्यांचे प्रमाणपत्र, मोबाइल क्रमांक, नोंद करताना देण्यात आलेली कागदपत्रे, कार्यालयीन अर्जांची मागणी केली. मात्र, ही कोणतीच माहिती नसल्याचे महापालिकेने पोलिसांना कळविले. त्यामुळे पोलिसांनी पालिकेने दिलेल्या माहितीच्या आधारावर नोंद करणाऱ्या ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना अटक केली आहे.

पोलिसांकडून तक्रार करण्यात आलेल्या बनावट मृत्यू प्रमाणपत्राबाबत चौकशी सुरू केली आहे. त्यानुसार संबंधित कालावधीत अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. तसेच हे प्रकार रोखण्यासाठी ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम केले जाणार आहेत. याची चौकशी सुरू असून, पुढील काही दिवसांत याचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. - डाॅ. निना बोराडे, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

Web Title: Bogus birth and death certificates are being received from the Municipal Corporation; Shocking details revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.