शहरी गरीब योजनेच्या बिलासाठी मृतदेह ८ तास अडवला; पूना हॉस्पिटलवर नातेवाइकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 12:20 IST2025-04-26T12:19:51+5:302025-04-26T12:20:18+5:30

रुग्णावर शहरी गरीब योजनेतून उपचार झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला आता मृतदेह नेता येणार नाही, तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी बिल भरून नंतरच मृतदेह नेता येईल

Body held for 8 hours over Urban Poor Scheme bill; Relatives accuse Pune hospital | शहरी गरीब योजनेच्या बिलासाठी मृतदेह ८ तास अडवला; पूना हॉस्पिटलवर नातेवाइकांचा आरोप

शहरी गरीब योजनेच्या बिलासाठी मृतदेह ८ तास अडवला; पूना हॉस्पिटलवर नातेवाइकांचा आरोप

पुणे: पूना हॉस्पिटल येथे पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजने अंतर्गत उपचार घेत असलेला रुग्ण शुक्रवार (दि. २५) रात्री दीड वाजता दगावला. मात्र, शहरी गरीब योजनेचे बिल सकाळी साडेआठनंतर होईल, असे सांगत सकाळी साडेनऊ वाजता तब्बल आठ तासांनी मृतदेह ताब्यात दिला, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. यावेळी बिल किती झाले? रात्री बिल भरायला तयार असतानादेखील याबाबत सकाळीच कार्यवाही होऊ शकते, असे सांगत आठ तास मृतदेह अडवून ठेवल्याचा आरोप मृताचे नातेवाईक नीलेश महाजन यांनी केला आहे. त्याबाबत महापालिकेच्या तक्रार निवारण कक्ष येथे फोनवर तक्रार दिली आहे. आरोग्य प्रमुखांना लेखी तक्रार केली असल्याचेही नीलेश महाजन यांनी सांगितले.

गेल्या काही महिन्यांपासून शुक्रवार पेठ येथील महेश पाठक (वय ५३) हे पूना हॉस्पिटल येथे उपचार घेत होते. त्यांचे दि. २५ रोजी रात्री दीड वाजता निधन झाले. रुग्णालय प्रशासनाने आता बिलिंगचे कर्मचारी नाहीत, उद्या सकाळी पैसे भरून मृतदेह घेऊन जाता येईल. मृतदेह आत्ता न्यायचा असेल तर पूर्ण पैसे भरावे लागतील. रुग्णावर शहरी गरीब योजनेतून उपचार झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला आता मृतदेह नेता येणार नाही. तुम्हाला सकाळी साडेआठ वाजता यावे लागेल. तेव्हा बिल भरून नंतरच मृतदेह नेता येईल, असे सांगून तब्बल आठ तासांनंतर मृतदेह पाठक कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे. मृतदेह नेताना मात्र पूना हॉस्पिटलने तुम्हाला कोणतेही बिल भरावे लागणार नाही. उलट आमच्याकडून तुम्हाला सात हजार रुपये परत करण्यात येणार आहेत. तुम्ही आता मृतदेह घेऊन जा. नंतर येऊन सात हजार रुपयांचा रिफंड घेऊन जा, असे सांगितल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. याबाबत नातेवाइकांनी महानगरपालिकेच्या आरोग्य प्रमुखांकडे लेखी तक्रार केली असून, कारवाईची मागणी केली आहे.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पैशाअभावी एका गरोदर महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पूना हॉस्पिटलबाबतच्या तक्रारीने वैद्यकीय व्यवस्थेबाबत चर्चांना उधाण आले आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर हॉस्पिटल प्रशासनाने संवेदनशीलता न दाखवता अडवणुकीची भूमिका घेणे हे गंभीर आहे.

रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळले

रात्रीच्या वेळेस रुग्णालयाकडे जी बिलिंग सिस्टीम आहे त्यानुसार प्रोव्हिजनल बिलिंग निघते. शहरी गरीब योजनेतील रुग्णांना पुणे महानगरपालिका कामगारांच्या दर पत्रकानुसार बिल आकारले जाते. त्यानुसार अंतिम बिल करून नातेवाइकांची सही घ्यायची असते. अंतिम बिल सकाळी बिलिंग विभाग सुरू झाल्यानंतर होते. याबाबत नातेवाइकांना कल्पना दिली होती. त्यावेळी त्यांनी काही हरकत नसल्याचे सांगत आम्ही सकाळी फॉर्मलिटी पूर्ण करू, असे सांगितले होते, अशी माहिती पूना हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने प्रसारमाध्यमांशी बोलताना देण्यात आली आहे.

पूना हॉस्पिटलमध्ये मृत रुग्णाबाबत जे काही घडले आहे त्याबाबत माझ्याकडे माहिती आली नाही. या प्रकरणी माहिती घेऊन चौकशीनंतरच योग्य ती कारवाई करण्यात येईल. - डॉ. नीना बोराडे, आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका 

Web Title: Body held for 8 hours over Urban Poor Scheme bill; Relatives accuse Pune hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.