पुणे : दहावी, बारावी परीक्षांच्या प्रवेशपत्रावर विद्यार्थ्यांच्या जात प्रवर्गाचा उल्लेख केल्याने समाजातील सर्वच स्तरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्यानंतर शनिवारी मंडळाने सपशेल माघार घेत ही प्रवेशपत्रेच रद्द केली. जातीचा उल्लेख काढून नवीन प्रवेशपत्रे दिली जाणार आहेत.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले असून, त्यावर विभागीय मंडळाचे नाव, कनिष्ठ महाविद्यालय, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख, लिंग, आईचे नाव, विद्याशाखा, अपंगत्व, बैठक क्रमांक, केंद्र क्रमांक, केंद्राचे नाव यासह यंदा प्रथमच जात प्रवर्ग नमूद केला हाेता.
दहावी, बारावीच्या प्रवेशपत्रावर जात प्रवर्गाचा उल्लेख, ही अयोग्य आणि अनावश्यक बाब असल्याचा आक्षेप अनेकांनी नोंदविला. समाजमाध्यमांमधूनही यासंदर्भात टीकेची झोड उठल्यानंतर ही प्रवेशपत्रे रद्द करण्यात आली.