भाजपचा प्रभाग रचनेतील हस्तक्षेप चिंताजनक; पालिका अन् पोलिसांचं मिळतंय सहकार्य, आघाडीचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:49 IST2025-08-05T10:48:35+5:302025-08-05T10:49:48+5:30
भाजपचा हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, महापालिकेने याबाबत वेळीच सुधारणा न केल्यास आघाडीकडून प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान दिले जाईल

भाजपचा प्रभाग रचनेतील हस्तक्षेप चिंताजनक; पालिका अन् पोलिसांचं मिळतंय सहकार्य, आघाडीचा आरोप
पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे. प्रभाग रचना व इतर प्रशासकीय बाबींची पूर्तता होत असताना या सर्व प्रक्रियेत सत्ताधारी पक्षांचा विशेषतः भारतीय जनता पक्षाचा हस्तक्षेप अतिशय चिंतेची बाब आहे. भाजपसाठी सोयीचे ठरतील, अशा प्रभागांची रचना करणे, राजकीय फायद्यासाठी शहरात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रवृत्त करणे, अशा अनेक मार्गाने भारतीय जनता पक्ष सक्रिय झाला आहे. या दुर्दैवी प्रकारात पुणे महानगरपालिका प्रशासन व पोलिस प्रशासनातील काही घटकांचे सत्ताधाऱ्यांना सहकार्य मिळत आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे.
महाविकास आघाडीच्या शहरातील प्रमुख नेत्यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यावेळी आमदार बापू पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, उद्धवसेनेचे संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, माजी महापौर अंकुश काकडे, कमल व्यवहारे, वसंत मोरे, रवींद्र माळवदकर, सुनील माने, किशोर कांबळे, सुजित यादव, आसिफ शेख आदी उपस्थित होते.
प्रभाग रचनेच्या प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाचा वाढता हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. महापालिका प्रशासनाने याबाबत वेळीच सुधारणा न केल्यास महाविकास आघाडीकडून प्रभाग रचनेला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असा इशारा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना दिला आहे. पुणे शहरातील विविध भागात हेतूपुरस्सर धार्मिक व जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याची सत्ताधाऱ्यांची नीती आहे. पोलिस प्रशासनाने याबाबत कठोर भूमिका घेत पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, अशी मागणीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे केली आहे.