भाजपची अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक अन् पवार विरुद्ध पवार ही लढत घडविण्याचा प्रयत्न - रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2024 19:38 IST2024-02-16T19:37:29+5:302024-02-16T19:38:07+5:30
बारामतीमध्ये अजित दादांचे झालेले भाषण बारामतीकरांना आणि महाराष्ट्रातही कोणालाच आवडले नाही

भाजपची अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक अन् पवार विरुद्ध पवार ही लढत घडविण्याचा प्रयत्न - रोहित पवार
बारामती : बारामतीत अनेक वर्षे भाजपला यश मिळत नाही. त्यासाठी त्यांना पवार विरुद्ध पवार अशी लढत करायची होती, त्याचेही प्रयत्न यापूर्वी झाले. पण यश येत नव्हते. आता पक्ष आणि कुटुंब फोडून त्यांनी हे करायचा प्रयत्न केला. भाजपने अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आजवर कधीही बारामतीत न झालेली पवार विरुद्ध पवार ही लढत घडविण्याचा प्रयत्न चालविला आहे, असा टोला आमदार रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे.
बारामती येथे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपवर निशाणा साधला. पवार पुढे म्हणाले, भाजपने आजवर आखलेले डाव यशस्वी झाले नव्हते. परंतु आता अजित पवार यांच्या माध्यमातून ते हे साध्य करू पाहत आहेत. भविष्यात लोक त्यांना उत्तर देतील. बारामतीमध्ये अजित दादांचे झालेले भाषण कोणालाच आवडलेले नाही. ते महाराष्ट्रातही कोणाला आवडले नाही. आणि बारामतीकरांनाही आवडलेले नाही. ज्या पद्धतीने ते बोलत होते तिथे मला असे वाटले होते की लोकसभेची लढत ही बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार होईल. सुप्रिया ताई या ठिकाणी खासदार आहेतच. आता विरोधात खासदार देण्याची जबाबदारी भाजपने मुद्दामहून अजित दादांवर टाकलेली आहे. जे आजपर्यंत भाजपला जमलेले नव्हते ते त्यांनी आता दुर्दैवाने कुटुंब आणि पक्ष फोडून ते करण्याचा प्रयत्न केला आहे. पण जेव्हा त्यांच्याकडून अधिकृतपणे याची घोषणा होईल, तेव्हाच मला यावर सविस्तर बोलता येईल. उमेदवारी दिल्यानंतर पुढे काय करायचे हे लोक ठरवतील, पवारसाहेब ठरवतील असे आमदार पवार म्हणाले.