पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माफी मागावी, अशी मागणी खासदार रजनी पाटील यांनी केली. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
पाटील म्हणाल्या, भाजपाच्या पोटात होते तेच ओठावर आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलभाजपाच्या मनात किती राग आहे, ते उघड झाले. सत्ताधारी भाजपाने लोकसभेला आखाडा बनवले आहे. भारतीय जनता पक्ष व त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या मनात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल प्रचंड राग आहे. भाजपाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कधीच आदर नव्हता आणि आजही नाही. महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान निर्मात्यांचा घोर अपमान केला आहे. दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय समाजाबद्दल भारतीय जनता पक्षाची मानसिकता अत्यंत द्वेषाची आहे. भाजपा शासित राज्यात मागासवर्गीय समाजावर अनन्वीत अत्याचार होत आहेत. तरीही पंतप्रधान मूग गिळून गप्प कसे काय आहेत? असा सवाल पाटील यांनी केला.