भाजप कार्यकर्ता काम करताना रस्त्यावर दिसायला हवा; रवींद्र चव्हाण यांनी घेतली कार्यकर्त्यांची शाळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 17:28 IST2025-07-17T17:26:22+5:302025-07-17T17:28:37+5:30
संघटनेने सांगितलेले प्रत्येक काम व्हायलाच हवे, मतदार यादी, मतदार संपर्क, बूथ केंद्र याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे

भाजप कार्यकर्ता काम करताना रस्त्यावर दिसायला हवा; रवींद्र चव्हाण यांनी घेतली कार्यकर्त्यांची शाळा
पुणे: भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता रस्त्यावर काम करताना दिसायला हवा. संघटनेने सांगितलेले प्रत्येक काम व्हायलाच हवे, मतदार यादी, मतदार संपर्क, बूथ केंद्र याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे अशा शब्दांमध्ये भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी भाजपच्या शहरातील मंडल पदाधिकारी व अन्य कार्यकर्त्यांची पक्ष कार्यालयात बुधवारी रात्री शाळा घेतली.
पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीसाठी चव्हाण बुधवारी पुण्यात आले होते. डीपी रस्त्यावरील एका कार्यालयात ही आढावा बैठक झाली. त्यानंतर चव्हाण यांनी पक्ष कार्यालयाला भेट दिली व उपस्थितांबरोबर संवाद साधला. शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांचे स्वागत केले. घाटे यांच्याकडून त्यांनी पक्षाची संघटनात्मक कामांची माहिती दिली. महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. संघटनेची म्हणून एक शिस्त असते. प्रत्येक कार्यक्रम हा विचारपूर्वक तयार केलेला असतो. त्यामुळे प्रदेश शाखेकडून आलेल्या कोणताही कार्यक्रम, उपक्रम राबवण्यात हयगय होता कामा नये असे त्यांनी बजावले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलैला वाढदिवस आहे. रक्तदान शिबिरांनी हा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे त्याचे तातडीने नियोजन करण्याचा आदेश चव्हाण यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करता चव्हाण यांनी त्यांच्याकडूनही शहर, तालुकानिहाय माहिती घेतली व त्यांना संघटनात्मक कामांबाबत सुचना दिल्या.