पुणे : राज्यात बिल्डर आणि ठेकेदारांचे सरकार काम करत आहे. मुंबई असो, नाशिक असो किंवा पुणे असो सगळीकडेच भाजपचे नेते भूखंड गिळण्याचे काम करत आहेत. मग त्या भूखंडावर रहिवासी असोत किंवा नसोत, अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.
नवी पेठेतील लोकमान्य नगरमधील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाचा मुद्दा मागील काही महिन्यांपासून गाजत आहे. रहिवाशांनी काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार हेमंत रासने यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून यासंदर्भात रोष व्यक्त केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रहिवाशांचा भेट घेऊन, आपण व आपला पक्ष शेवटपर्यंत रहिवाशांसोबत राहिल असे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर, शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, माजी गटनेते अशोक हारनावळ आदींसह रहिवासी उपस्थित होते.
यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, रहिवाशांनी वसाहतींचा स्वयंपुनर्विकास करण्याचा निर्णय घेऊन २०२२ पासून त्यांनी आपापले विकासक शोधले. मात्र, मे महिन्यात स्थानिक आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन याला स्थगिती आणली. क्लस्टरच्या माध्यमातून एक आवडता बिल्डर रहिवाशांवर लादला जात आहे. जे काय करायचे आहे ते स्थानिकांना विश्वासात घेऊन करणे गरजेचे आहे. रहिवाशांनी जर त्यांचे विकासक नेमले असतील तर मग स्थानिक आमदारांना काय अडचण आहे, हे त्यांनी स्पष्ट करावे, असेही ते म्हणाले.
खरे तर सत्ताधारी भाजपचे नेते सगळीकडे भूखंड गिळण्याचे काम करत आहेत. वेताळ टेकडी असेल किंवा जैन बोर्डींग असेल, सर्व बिल्डर, ठेकेदार व व्यावसायिकांसाठी सुरू आहे. जैन बोर्डींगमध्ये विषयात कोण होते, बिल्डर कोणाचा आहे, हे सर्वांना माहिती आहे. नंतर हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी मीटवल्याचे दाखवण्यात आले. भाजपचे स्थानिक आमदार व शहराध्यक्ष यांच्यात मतभेद नाही, ते सेटींगचे राजकारण आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
बुलडोझर व रहिवाशांच्या मधे आम्ही असू
लोकमान्य नगरमधील पुनर्विकासाचा विषय आम्ही विधीमंडळात मांडला आहे, यापुढेही हा विषय मांडू. त्यांनी तर बुलडोझर आणि रहिवाशांच्या मध्ये आम्ही असू. मात्र, रहिवाशांना सरकारची भूमिका मान्य झाली, तर त्या भूमिकेलाही आमचा पाठींबा असेल. विकासक ठरवण्याचे अधिकार तुम्हालाच आहेत. तुमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न होईल, त्यामुळे तुम्ही एकजुट कायम ठेवा, तुम्हाला कोणीही हाथ लावणार नाही. आम्ही शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहोत, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी रहिवाशांना दिले.