भाजप निष्ठावंतांना संपवतंय; अजित पवारांना युतीपासून लांब ठेवलं जातंय, शशिकांत शिंदेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 16:59 IST2025-12-19T16:58:19+5:302025-12-19T16:59:46+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता आणि सरकार चालवायचे आहे. त्यांना मित्रपक्षांना नाराज करायचं नाही. दिल्ली वरून त्यांना सांगितलं असेल

भाजप निष्ठावंतांना संपवतंय; अजित पवारांना युतीपासून लांब ठेवलं जातंय, शशिकांत शिंदेंची टीका
पुणे : शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे पालिका निवडणुकीनंतर अस्तित्व संपणार नाही. या प्रकारे कुठल्याही पक्षाच अस्तित्व संपत नाही. भाजपमध्ये निष्ठावंत कार्यकत्यांना डावलून संपवत चालले आहे. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी पक्षात त्यांच काय अस्तित्व आहे हे पहावे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. भाजप मित्रपक्षांचा वापर फक्त निवडणुकीसाठी करत आहे. पालिका निवडणुकीत महायुतीमधील दोन पक्ष एकत्र येत आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना युतीपासुन लांब ठेवलं जात आहे. राजीनामा देखील केवळ अजित पवार यांच्या मंत्र्यांचे का होतात असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शशिकांत शिंदे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, आमदार बापू पठारे, माजी आमदार अशोक पवार, माजी शहराध्यक्ष रविंद्र माळवदकर आदी उपस्थित होते.
शशिकांत शिंदे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षात दोन मत प्रवाह असल्याची चर्चा सुरू आहे आमची महाविकास आघाडीशी चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीबरोबर मनसे येउ इच्छित आहे. पण मनसेला बरोबर घेण्यास कॉ्ग्रेसचा विरोध आहे. पण दुसरे पर्याय आहेत पण अजून चर्चा झाली नाही.आजची चर्चा तरी महाविकास आघाडी सोबतच सुरू आहे. अजून तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कुठलाही प्रस्ताव आला नाही.
गृहखाते फेल ठरलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता आणि सरकार चालवायचे आहे. त्यांना मित्रपक्षांना नाराज करायचं नाही. दिल्ली वरून त्यांना सांगितलं असेल. त्यानुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना क्लिनचीट दिली असेल. सातारा सारख्या ठिकाणी जर ड्रग्स चे कारखाने असतील तर हा प्रकार गंभीर आहे. पोलीस यंत्रणा काय करत होती असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे गृहखाते फेल ठरलं आहे अशी टिका शशिकांत शिंदे यांनी केली.
आधी मित्रपक्षाशी चर्चा करू मग पुढचा निर्णय घेऊ
पालिका निवडणुकीत कोणत्या पक्षाबरोबर चर्चा करायची याचे सगळे निर्णय राज्यस्तरावर होतील. पुण्यात काही लोक म्हणत आहेत की महाविकास आघाडी म्हणून लढू आणि काही लोक म्हणत आहेत की दुसरा पर्याय खुला रहावा. किती जागा मिळाव्यात हा अधिकार स्थानिक नेत्यांना दिला आहे . सन्मानजनक जागा मिळवतात ही अपेक्षा आहे. आधी मित्रपक्षाशी चर्चा करू मग पुढचा निर्णय घेऊ असेही शशिकांत शिंदे यांनी सांगितले.